Ads
Ads

अवैध धंद्यांचा बोलबाला; शिरूरमध्ये कायद्याचा धाक हरवला!

खून, खुनाचे प्रयत्न, हाणामाऱ्या, घरफोड्या, चोऱ्यांत वाढ; अवैध व्यवसायांवर कारवाईत कुचराईची चर्चा, पोलिस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) :

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका हा औद्योगिक, कृषी आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खून, खुनाचे प्रयत्न, जीवघेणे हल्ले, घरफोड्या, जबरी चोरी, मारहाण, महिलांवरील अत्याचार तसेच विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे गुटखा, मटका, जुगार, अवैध दारू विक्री, वाळू तस्करी आणि इतर अवैध व्यवसायांचे जाळेही विस्तारत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे "शिरूरमध्ये कायद्याचा धाक हरवला आहे का?" असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उपलब्ध पोलीस गुन्हा नोंदींनुसार अल्पावधीतच शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातही सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

याचवेळी तालुक्यात अवैध व्यवसायांवर प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. अनेक ठिकाणी गुटखा विक्री, मटका-जुगार, अवैध दारू विक्री, वाळू तस्करी आणि इतर बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. संबंधित यंत्रणांकडून कारवाई होत असली तरी ती अपुरी ठरत असल्याची चर्चा असून त्यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, अवैध व्यवसाय आणि वाढती गुन्हेगारी यांचा परस्पर संबंध नाकारता येत नाही. अशा धंद्यांमधून निर्माण होणारे आर्थिक हितसंबंध, वर्चस्वाची स्पर्धा, खंडणी, जमिनीचे वाद आणि दहशत यामुळे गंभीर गुन्ह्यांना खतपाणी मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दिवसाढवळ्या होणाऱ्या मारहाणी, घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमुळे व्यापारी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त अधिक प्रभावी करण्याबरोबरच संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

तालुक्यात कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, नियमित कोम्बिंग ऑपरेशन, अवैध व्यवसायांवर धडक मोहिमा, गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि प्रत्येक गंभीर गुन्ह्याचा जलद तपास करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

शिरूर तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष घालून विशेष मोहीम राबवावी, अवैध धंद्यांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करावे आणि कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करावा, अशी जोरदार मागणी नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

शिरूरसारख्या महत्त्वाच्या तालुक्यात नागरिकांनी भीतीमुक्त वातावरणात जगण्यासाठी कायद्याचा धाक आणि पोलिसांचा वचक पुन्हा निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.(क्रमशः)