Ads
Ads

'शिवसेना कोणाची?' जनतेनेच निकाल दिला; विरोधकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

४० वरून ६० आमदारांपर्यंतचा जनादेश म्हणजेच शिवसेनेच्या नेतृत्वावर जनतेचा कौल

 

न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्याचे शिंदेंचे ठाम प्रतिपादन


मुंबई,( प्रतिनिधी ) -

शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवत, "शिवसेना कोणाची याचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दिला आहे. आम्ही ४० आमदारांसह बाहेर पडलो आणि जनतेने आम्हाला ६० आमदारांपर्यंत पोहोचवून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले," असे ठाम शब्दांत सांगितले.

शिंदे म्हणाले, "जनतेच्या न्यायालयात आमचा विजय आधीच झाला आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची, याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून स्पष्टपणे दिले आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेवरही आमचा पूर्ण विश्वास आहे."

विरोधकांच्या सातत्याने करण्यात आलेल्या 'घटनाबाह्य सरकार'च्या आरोपांचा समाचार घेताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निकालाचा उल्लेख केला. "सरकार संविधानाने आणि कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेनुसार स्थापन झाले असून ते घटनाबाह्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तरीही विरोधक तीच जुनी आणि फाटलेली कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवत आहेत," असा टोला त्यांनी लगावला.

पुढे शिंदे म्हणाले, "विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. निकाल त्यांच्या बाजूने लागला तर न्यायालयाचा गौरव करायचा आणि निकाल विरोधात गेला की न्यायालयालाच शिकवण्याचा प्रयत्न करायचा. न्यायव्यवस्थेवर आरोप, निवडणूक आयोगावर टीका आणि घटनात्मक संस्थांवर अविश्वास दाखवणे, ही त्यांची कायमची राजकीय संस्कृती आहे."

"आम्ही कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही. आम्ही जनतेच्या विश्वासावर आणि न्यायदेवतेवर श्रद्धा ठेवतो. सत्य, संविधान आणि जनमत या तिन्ही गोष्टी आमच्या बाजूने असल्याने आम्ही निर्धास्त आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना कोणाची, या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असली तरी राजकीय आणि जनाधाराच्या कसोटीवर शिवसेनेवर जनतेनेच शिक्कामोर्तब केले आहे, असा ठाम दावा करत शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केला.