आधी ड्रग्ज, नंतर बलात्कार; तरीही ‘मार्वेल इन’च्या मालकाला अभय कोणाचे? शिरूर पोलिसांचे हात बांधलेत की विकलेत? शिरूरकरांचा सवाल!
शिरूर (विशेष प्रतिनिधी) –
शिरूर शहराच्या शांततेला सुरुंग लावणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारी एक धक्कादायक मालिका समोर आली असून, शहरातील नामांकित समजले जाणारे ‘हॉटेल मार्वेल इन’ आता गुन्हेगारी आणि काळ्या धंद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनल्याचे सिद्ध झाले आहे. अवघ्या ४८ तासांच्या अंतरात याच हॉटेलमध्ये आधी सुमारे ९ लाख रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त झाले आणि त्यापाठोपाठ एका निष्पाप तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. एकाच छताखाली सलग दोन भयंकर गुन्हे घडूनही हॉटेल मालक आणि व्यवस्थापनावर कारवाई करण्याचे साधे धाडस शिरूर पोलिसांनी दाखवलेले नाही. त्यामुळे गुन्हेगारांपेक्षा हॉटेल व्यवस्थापनाला पाठीशी घालणारी ही खाकी नेमकी कोणाच्या दबावाखाली लाचार झाली आहे? असा जळजळीत सवाल संपूर्ण शिरूर तालुक्यातून विचारला जात आहे.
९ लाखांचे एमडी ड्रग्ज सापडले, तरीही यंत्रणा ढिम्मच!
दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि शिरूर पोलिसांनी 'हॉटेल मार्वेल इन'वर धाड टाकून तब्बल ९ लाख रुपये किमतीचे २० ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य हस्तगत केले होते. पुण्यासारख्या महानगराप्रमाणे आता शिरूरच्या गल्लीबोळांत आणि लॉज-हॉटेल्समध्ये तरुणाईच्या नसांत अमली पदार्थांचे विष कालवले जात असल्याचा हा उघड पुरावा होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा हॉटेलच्या खोलीत पोहोचतोच कसा? हॉटेल प्रशासनाला याची गंधवार्ता नव्हती की त्यांचा यात थेट डोळेझाकपणा होता? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याऐवजी पोलिसांनी केवळ तात्पुरती कारवाई दाखवून मूळ सुत्रधारांना हात लावणे टाळल्याचा आरोप होत आहे.
ड्रग्जचा धुरळा शांत होतो न होतो, तोच तरुणीवर बलात्कार!
अमली पदार्थांच्या कारवाईचा पंचनामा सुकला नाही तोच, याच ‘मार्वेल इन’च्या एका खोलीत तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक गुन्हा दाखल झाला. या भीषण घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेले हे हॉटेल म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सुविधा केंद्र नसून समाजकंटक, व्यसनी आणि विकृत प्रवृत्तींचा सुरक्षित अड्डा बनले आहे, यावर या दोन्ही घटनांनी शिक्कामोर्तब केले आहे. महिला सुरक्षेचे गोडवे गाणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अशा घटना घडत असताना पोलीस मात्र निव्वळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहेत.
हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात; नियम धाब्यावर!
हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायासाठी शासनाने घालून दिलेली कडक नियमावली ‘मार्वेल इन’मध्ये पायदळी तुडवली गेल्याचे स्पष्ट दिसते:
ओळखपत्रांशिवाय प्रवेश? संशयित आरोपींना खोल्या देताना आधार कार्ड अथवा अधिकृत ओळखपत्रांची पडताळणी झाली होती का?
सीसीटीव्ही फुटेजचे काय झाले? हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते की संशयास्पद कृत्ये लपवण्यासाठी जाणीवपूर्वक बंद ठेवले गेले?
कर्मचाऱ्यांचे मूक संमती? एकाच हॉटेलमध्ये अमली पदार्थांची विक्री आणि अत्याचारासारख्या विकृती घडत असताना व्यवस्थापन अथवा कर्मचाऱ्यांना काहीच कसे समजले नाही?
हे सर्व प्रश्न अनुत्तरित असतानाही पोलिसांनी अद्याप हॉटेल मालक अथवा मॅनेजरवर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल का केला नाही, हे एक मोठे गूढ आहे.
बड्या राजकीय नेत्याचा वरदहस्त; पोलिसांवर दबाव?
शिरूरच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच गोष्टीची जोरदार चर्चा आहे—'मार्वेल इन'च्या मालकाच्या डोक्यावर नेमका कोणत्या मातब्बर नेत्याचा हात आहे? स्थानिक पातळीवर वजन असलेल्या एका बड्या राजकीय वरदहस्तामुळेच पोलिसांचे हात बांधले गेले आहेत का? सामान्य नागरिकांच्या साध्या गुन्ह्यांवर तातडीने कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस या प्रकरणात एवढे लाचार का दिसत आहेत? 'हॉटेल मालकाला वाचवण्यासाठी पोलिसांचे हात कुणी बांधलेत की विकलेत?' असा संतप्त सवाल आता सामान्य जनता उघडपणे विचारत आहे.
हॉटेलवर टाळे ठोका, परवाना रद्द करा; जनआंदोलनाचा इशारा
शिरूरची शांतता भंग करणाऱ्या, तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्ज रॅकेटला आणि महिलांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या या हॉटेलचा व्यावसायिक परवाना अन्न व औषध प्रशासन, नगरपरिषद आणि पोलिसांनी तात्काळ कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हॉटेल मालकावर गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी आणि गुन्हेगारांना थारा दिल्याप्रकरणी सहआरोपी म्हणून तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी. जर राजकीय दबावाला बळी पडून प्रशासनाने चालढकल केली, तर शिरूर बंद ठेवून पोलीस ठाण्यावर तीव्र जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा विविध सामाजिक संघटना आणि संतप्त नागरिकांनी दिला आहे.


