अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत १९४ जणांची माघार :पाचजण बिनविरोध तर २८३ उमेदवार रिंगणात
अहिल्यानगर (प्रतिनिधी ) - महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यापूर्वीच पाच उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमारसिंह वाकळे, प्रकाश भागानगरे यांच्यासह भाजपच्या पुष्पा बोरुडे, करण कराळे व सोन्याबाई शिंदे यांनी आज गुलाल उधळत विजय साजरा केला. आज शेवटच्या दिवशी १९४ उमेदवारांनी माघार घेतली असून २८३ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी चिन्हांचे वाटप होताच प्रचाराचा धुराळा उडणार आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी सलामी दिली आहे. प्रचाराचा धुराळा उडण्यापूर्वीच पाच जागा बिनविरोध करण्यात दोन्ही पक्षांना यश आले आहे. राजकीय डावपेच टाकत प्रभाग क्रमांक ८ मधील राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे व प्रभाग क्रमांक १४ मधील प्रकाश भागानगरे हे दोन उमेदवार गुरुवारी बिनविरोध झाले होते. त्या पाठोपाठ आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपचे करण कराळे आणि सोन्याबाई शिंदे, तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील पुष्पा बोरुडे हे भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध झाले. राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी विजयी सलामी देत सत्तेचे मनसुबे आखले आहेत.
महापालिका निवडणूक ६८ जागांवर होत असली तरी पाच जणांच्या बिनविरोध निवडीमुळे ही निवडणूक आता केवळ ६३ जागांवर होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी केली असली तरी काही प्रभागात मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. त्याचबरोबर अपक्षांची संख्या मोठी असल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. शनिवारी चिन्ह वाटप झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार देखील प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.
शिरसुल म्हणतात... मी अर्ज मागे घेतलाच नाही
प्रभाग क्रमांक ६ मधील शिवसेनेचे उमेदवार शिरसुल यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या सोन्याबाई शिंदे बिनविरोध झाल्या आहेत. परंतु मी उमेदवारी अर्ज मागे घेतलाच नाही, असे शिरसुल यांचे म्हणणे आहे. शिवसेनेचे संभाजी कदम यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु शिरसुल यांच्या उमेदवारी अर्ज माघारी तर अखेर सोन्याबाई शिंदे या बिनविरोध ठरल्या आहेत.


