(आनंदाचा शिधा)- ऐन दिवाळीत शिध्याचा आनंद नाही ; आर्थिक तरतूद न केल्याने गोरगरिबांना फटका
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने 400 निर्णय घेतले. मात्र, गोरगरिबांसाठी महत्त्वाचा असणार्या आनंदाच्या शिधाबाबत कुठलीही आर्थिक तरतूद केली नाही. याचा फटका गोरगरिबांना बसणार असून ते आनंदाच्या शिधापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.
शिंदे - फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर 2022 पासून आधी दिवाळी आणि त्यानंतर गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी- गणपती या सणांत सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा देण्यात येतोय. यात 100 रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ आणि पाम तेल देण्यात आले होते.
राज्य सरकाने महिला सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा यासारख्या नवीन योजना आणल्या. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाच्या शिधासाठी तरतूद करायला राज्य सरकार विसरल्याचे चित्र आहे. यामुळे रेशनधारकांना आनंदाच्या शिधाशिवाय दिवाळी साजरी करावी लागणार आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 3 लाख 20 हजार 443 रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत वडारवाडी येथील रेशन दुकानदार अनिल चौगुले यांनी सांगितले की, गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा उशिरा आल्याने आतापर्यंत त्याचे वितरण केले. दिवाळी तोंडावर आल्याने अनेकांकडून आनंदाच्या शिधाबाबत विचारणा करण्यात येत आहे. मात्र, सरकारकडून अजूनही आनंदाचा शिधाबाबत काही सांगण्यात आले नाही. यामुळे रेशनकार्डधारकांना दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे सांगत आहोत. याच भागात राहणार्या सुरेखा अवघडे यांनी सांगितले की, मोलमजुरीचे काम करते. गणेशोत्सवातील आनंदाचा शिधासुद्धा उशिरा मिळाला होता. दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे रेशन दुकानदाराकडून समजले. सरकारकडून दिवाळीत आनंदाचा शिधा मिळावयास हवा होता. दोन वर्षे दिला आणि आता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
आनंदाच्या शिधासंदर्भात काही सूचना आल्या नाहीत. त्यामुळे यंदा दिवाळीत आनंदाचा शिधा वाटप होणार नाही.
--महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
शहरातील रेशन दुकानावर आनंदाचा शिधाबाबत विचारणा होत आहे. 400 रुपयांच्या वस्तू सवलतीच्या दरात 100 रुपयांना मिळत असल्याने अनेकांना दिलासा मिळत होता. मात्र यंदा सरकारने आनंदाच्या शिधासाठी कुठलीही तरतूद केली नसल्याने या वर्षी दिवाळीत गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे चित्र आहे.


