Ads
Ads

अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड, बारा हजारांच्या मुद्देमालासह चौघे केले गजाआड! शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी उघडली अवैध व्यवसायिकांविरोधात कारवाईची मोहीम

अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड, बारा हजारांच्या मुद्देमालासह चौघे केले गजाआड!

शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी उघडली अवैध व्यवसायिकांविरोधात कारवाईची मोहीम

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) —

शिरूर शहर व परिसरात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. त्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडली असून, शिरूर पोलिसांनी एका पत्यांच्या अड्ड्यावर धाड टाकून चार जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह १२,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर हद्दीतील मौजे शिरूर येथील ‘जगदंब चायनिज’ सेंटरच्या शेजारी असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तात्काळ छापा टाकला.

या छाप्यात १) राहुल भाऊसाहेब सोनवणे (वय २४, रा. पाबळफाटा, शिरूर), २) रोहन राजू पवार (वय १९, रा. पाबळफाटा, शिरूर), ३) रविराज गोरख गव्हाणे (वय २८, रा. आण्णापूर, ता. शिरूर) आणि ४) महादेव मच्छिंद्र मोरे (वय ३२, रा. पाबळफाटा, शिरूर) हे चौघे तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळताना रंगेहात मिळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम १२,५५० रुपये, दोन पत्त्यांचे कॅट आणि एक बॉलपेन असा जुगाराचे साहित्य व मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८८६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल गणेश संभाजी गोसावी (बक्कल नं. २६८६) यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस हवालदार शिंदे (बक्कल नं. २४६३) यांनी पाहिले. पोलीस उपनिरीक्षक मुळीक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंदे चालवणाऱ्यां विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतल्यामुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले असून, "हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत; अशा घटकांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

​"शिरूर शहर व ग्रामीण भागात जुगार, मटका, अवैध दारू विक्री किंवा इतर कोणताही बेकायदेशीर व्यवसाय चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनीही अवैध धंद्यांची गोपनीय माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे."

— विनोद पाटील (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे)

 

 

"शिरूर उपविभागातील शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. सर्व संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आपापल्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. हद्दीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही आमची प्राथमिकता असून अवैध धंदे चालवणाऱ्यांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कायदेशीर बडगा उगारला जाईल."

 — रवींद्र भोसले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग)