टाकळी हाजी चौकीत दोन-दोन उपनिरीक्षक; मग गांजा तस्करांसह काळ्या धंद्यांना कोणाचा अभय? अधिकारी करतात तरी काय?
बेट भागात अवैध धंद्यांचे फुटले पेव; ढाब्यांवर सर्रास दारूविक्री, स्थानिक पोलिसांचे मात्र 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष?
शिरूर (प्रतिनिधी) -
शिरूर तालुक्याच्या बेट भागात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांनी अक्षरशः विळखा घातला असून, नुकत्याच घडलेल्या गांजा तस्करीच्या कारवाईने स्थानिक पोलिस प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राला (चौकीला) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल दोन-दोन पोलिस उपनिरीक्षक (PSI) दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. मात्र, दोन जबाबदार अधिकारी तैनात असतानाही हद्दीत गांजा तस्करांसह काळे धंदे फोफावले कसे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून हे अधिकारी चौकीत बसून नेमके करतात तरी काय, अशी जोरदार चर्चा आता रंगली आहे.
LCB च्या धाडीने उडाली झोप; स्थानिक यंत्रणेला गंधही नाही!
कवठे येमाई परिसरातील इचकेवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) थेट छापा टाकून एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून तब्बल ६१ किलो गांजा आणि गाडी असा एकूण ४० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोपट विठ्ठल शितोळे याला अटक करण्यात आली.
ही घटना घडलेले ठिकाण टाकळी हाजी दूरक्षेत्राच्या हद्दीत येते. धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा एका घरासमोर वाहनात भरून ठेवला जातो आणि त्याची विक्री करण्याची तयारी सुरू असते, तरीही स्थानिक चौकीच्या अधिकाऱ्यांना याचा साधी कुणकुणही लागत नाही. पुण्याहून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येऊन थेट कारवाई करते, पण स्थानिक अधिकारी मात्र अनभिज्ञ कसे, यावरून त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बेट भागात अवैध धंद्यांचे पेव; ढाब्यांवर रात्री उशिरापर्यंत पार्ट्या
गेल्या काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यातील बेट भागात अवैध धंद्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.शिरूर-मंचर रस्त्यासह परिसरातील ग्रामीण रस्त्यांवरील ढाब्यांवर नियम धाब्यावर बसवून सर्रास बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची विक्री केली जात आहे. रात्रीच्या वेळी ढाब्यांवर दारू पिणाऱ्यांची रेलचेल पाहायला मिळते, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
युवा तरुणाई व्यसनाच्या गर्तेत अडकल्याचे दिसत आहे.गावात गांजा, गुटखा आणि जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याने महाविद्यालयीन तरुण व शाळकरी मुले व्यसनाच्या जाळ्यात ओढली जात आहेत.
वाढत्या अवैध व्यवसायामुळे महिला व नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून ढाब्यांवर आणि चौकाचौकात जमणाऱ्या मद्यपींमुळे संध्याकाळच्या वेळी महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणे मुश्कील झाले आहे.
दोन-दोन उपनिरीक्षक केवळ देखाव्यासाठीच?
एखाद्या मोठ्या पोलीस ठाण्याप्रमाणे टाकळी हाजी चौकीसाठी शासनाने दोन-दोन पोलीस उपनिरीक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, या अधिकाऱ्यांचा स्थानिक गुन्हेगार आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांवर काडीचाही वचक राहिलेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळे धंदे सुरू असताना पोलिसांना ते दिसत नाहीत की जाणूनबुजून डोळेझाक केली जाते, यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अमली पदार्थ व अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचे आदेश दिलेले असताना, टाकळी हाजी चौकीचे अधिकारी मात्र वरिष्ठांच्या आदेशांना हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. आता वरिष्ठ पोलिस अधिकारी या दोन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून बेट भागातील अवैध धंद्यांवर कायमचा हातोडा मारणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


