ॲड. संजय येवलेंचा युक्तिवाद ठरला भारी; पॉक्सोतील आरोपीची निर्दोष सुटका, संपली कारागृहाची वारी!
शिरूर सेशन कोर्टातील पहिल्याच केसचा महत्त्वपूर्ण निकाल; संतोष गोफणेची आरोपातून सन्मानपूर्वक मुक्तता
शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्यंत संवेदनशील अशा बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्ह्यातून आरोपी संतोष रंगनाथ गोफणे (रा. रामवाडी, बोऱ्हाडेवस्ती, पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे) याची घोडनदी-शिरूर येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बचाव पक्षाचे वकील ॲड. संजय येवले यांनी केलेला प्रभावी व मुद्देसूद युक्तिवाद या खटल्यात निर्णायक ठरला.
शिरूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ५७६/२०२४ अन्वये आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलमांसह पॉक्सो कायद्यातील गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी विशेष खटला क्रमांक २१०/२०२६ अंतर्गत घोडनदी-शिरूर येथील मा. एन. एस. मोमीन, जिल्हा न्यायाधीश-०८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात पार पडली. नव्याने सुरू झालेल्या शिरूर सत्र न्यायालयातील निकाली निघालेल्या पहिल्याच काही महत्त्वाच्या खटल्यांमध्ये या प्रकरणाचा समावेश असल्याने या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
सुनावणीदरम्यान आरोपीतर्फे ॲड. संजय येवले यांनी न्यायालयात बाजू मांडताना फिर्यादी पक्षाचे आरोप, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांमधील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. बचाव पक्षाने मांडलेले कायदेशीर मुद्दे ग्राह्य धरत मा. न्यायालयाने ३ सप्टेंबर २०२६ रोजी आपला न्यायनिर्णय जाहीर केला आणि आरोपी संतोष गोफणे यास सर्व आरोपांतून दोषमुक्त ठरवले. न्यायालयाच्या या आदेशानंतर आरोपीची कारागृहातून सन्मानपूर्वक मुक्तता झाली आहे.


