डीपी चोरांना बसला दणका; शिरूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचा धडाकेबाज झटका!
शिरूर (भगवान श्रीमंदिलकर ) -
शिरूर तालुक्यात वारंवार होत असलेल्या वीज वितरणाच्या डीपी (विद्युत रोहित्र) चोरीच्या घटनांना अखेर शिरूर पोलिसांनी मोठा आळा घातला आहे. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक करून तब्बल १८ डीपी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून सुमारे ३०० किलो वजनाची तांब्याची तार व मोटारसायकल असा एकूण सुमारे ₹४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी डीपी फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरी करण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन शेतकरी, ग्रामस्थ आणि उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान होत होते. या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत
पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संतोष बारकू भालेराव व किरण गोविंद खंडागळे (रा. जळुके बुद्रुक, ता. खेड) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शिरूर परिसरातील १८ डीपी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर विविध गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत आरोपींकडून चोरीस गेलेल्या डीपीमधील ३०० किलो तांब्याच्या तारा आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना १० जुलै २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


