लोणी काळभोरला ‘एपीआय’, तर बारामतीत ‘हवालदार’ जाळ्यात; एसीबीने दिला दणका भारी! लाच घेताना रंगेहात सापडले पोलीस खात्यातील दोन ‘कारभारी’!
पुणे (भगवान श्रीमंदिलकर) :
पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलाला हादरवून सोडणाऱ्या दोन वेगवेगळ्या धडक कारवायांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) खाकी वर्दीतील दोघा लाचखोरांना रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) ५० हजार रुपयांची लाच घेताना स्वतःच्या अलिशान कारमध्ये रंगेहात पकडला गेला, तर दुसरीकडे बारामती तालुका पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला चक्क ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना जेरबंद करण्यात आले. अवघ्या २४ तासांच्या अंतरात शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या या लागोपाठच्या कारवाईमुळे पोलीस खात्यातील भ्रष्ट कारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले असून, पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा जनार्दन बाबर (वय ४५, रा. महादेव नगर, मांजरी, पुणे) याच्यावर कारवाई करण्यात आली. तक्रारदार (वय ५७) आणि त्यांच्या मुलावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल असून त्याचा तपास एपीआय बाबर याच्याकडे होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात लवकर दाखल करण्यासाठी ५० हजार रुपये आणि तक्रारदाराच्या मुलाला उच्च न्यायालयात सुरू असलेल्या अटकपूर्व जामीन अर्जात मदत करण्यासाठी २ लाख रुपये, अशी अडीच लाखांची मागणी बाबरने केली होती. तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर दि. ८ सप्टेंबर रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी झाली आणि चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी बाबरने ५० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रात्री ११.०२ वाजता मांजरी येथील शितलादेवी मंदिरासमोर रचलेल्या सापळ्यात, बाबरने स्वतःच्या सिआझ कारमध्ये (MH 04 KB 7879) ५० हजार रुपयांची रोकड स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर, पोलीस शिपाई भूषण ठाकूर, महिला पोलीस शिपाई वैशाली माकर व चालक पोलीस हवालदार दीपक काकडे यांच्या पथकाने केली.
दुसऱ्या धक्कादायक कारवाईत, बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेश अंकुश उगले (वय ३६, रा. विजयनगर, बारामती) याला तब्बल ५ लाखांची लाच घेताना पकडण्यात आले. तक्रारदाराच्या पत्नी चालवत असलेल्या झुंबा डान्स क्लास व जिमविरोधात नागरिकांच्या तक्रारी अर्जावरून तपास हवालदार उगले याच्याकडे होता. पती-पत्नीवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी उगलेने तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी २ लाख रुपये त्याने यापूर्वीच उकळले होते, तर उर्वरित ५ लाख रुपयांसाठी तो तगादा लावत होता. तक्रारीच्या पडताळणीनंतर दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०२ वाजता बारामती-माळेगाव रस्त्यावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेवळ पंचांसमक्ष ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना हवालदार उगले याला एसीबीने रंगेहात पकडले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील, हवालदार प्रवीण तावरे, कॉन्स्टेबल अश्विन कुमकर व चालक कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांनी पार पाडली.
सदर दोन्ही कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक श्री. सतिश वाळके यांच्या पर्यवेक्षणात करण्यात आल्या. शासकीय कामात कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता एसीबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ अथवा व्हॉट्सॲप क्रमांक ९४०३७८१०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


