पोलीस आयुक्तांचा नागरिकांच्या हिताचा निर्धार, शनिवारी तक्रार निवारण दिनी वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष हजर राहून निवारण करणार!
'नागरिकांनी निर्भयपणे पोलीस ठाण्यात यावे - — अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर
पुणे (प्रतिनिधी) :
पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि प्रलंबित तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त यांच्या थेट आदेशानुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी विशेष "तक्रार निवारण दिन" आयोजित केला जाणार आहे. त्यानुसार येत्या शनिवारी, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उप-आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार प्रादेशिक अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमुळे नागरिकांना आपल्या समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर थेट मांडण्याची संधी मिळणार आहे.
शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० दरम्यान होणार सुनावणी
शनिवार, दि. ०३/१०/२०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ०१:३० या वेळेत वरिष्ठ अधिकारी निश्चित केलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांच्या भेटीसाठी उपस्थित राहतील.
* पोलीस उप-आयुक्त यांची उपस्थिती:
परिमंडळ १ चे डीसीपी फरासखाना पोलीस ठाण्यात, परिमंडळ २ - आंबेगाव, परिमंडळ ३ - नांदेडसिटी, परिमंडळ ४ - खडकी, परिमंडळ ५ - लष्कर, परिमंडळ ६ - हडपसर, परिमंडळ ७ - विमानतळ, विशेष शाखा - बाणेर, वाहतूक शाखा - शिवाजीनगर, मुख्यालय - मुंढवा, गुन्हे शाखा - गुन्हे शाखा कार्यालय आणि आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे अधिकारी आपल्या संबंधित कार्यालयात उपस्थित राहतील.
* सहाय्यक पोलीस आयुक्त यांची उपस्थिती:
खडक, डेक्कन, सहकारनगर, मार्केटयार्ड, अलंकार, सिंहगड रोड, चतुःश्रृंगी, येरवडा, वानवडी, कोरेगाव पार्क, काळेपडळ, फुरसुंगी, वाघोली, चंदननगर आणि नऱ्हे (वाहतूक-१) या पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः हजर राहतील.
ज्या ठिकाणी पोलीस उप-आयुक्त अथवा सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित नसतील, त्या ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः तक्रार निवारणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
पोलीस ठाण्यात ज्या नागरिकांचे तक्रार अर्ज प्रलंबित आहेत, त्यांनी कोणत्याही मध्यस्थाशिवाय या वेळेत आपल्या संबंधित पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले गारऱ्हाणे मांडावे, असे आवाहन पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
'नागरिकांनी निर्भयपणे पोलीस ठाण्यात यावे - — अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर
"सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे, हा पुणे पोलिसांचा मुख्य उद्देश आहे. पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांवर थेट तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय किंवा संकोच न बाळगता शनिवारच्या 'तक्रार निवारण दिनी' पोलीस ठाण्यात हजर राहून आपल्या समस्या मांडाव्यात; त्यांच्या तक्रारींची योग्य दखल घेऊन न्याय मिळवून दिला जाईल."


