पोलिस अधिकाऱ्याचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श: सपोनि नितीन केणेकर यांच्या मुलाचा वाढदिवस सिंधुताई सपकाळ आश्रमातील मुलांसोबत साजरा
शिरूर (प्रतिनिधी) - अनावश्यक आणि दिखाऊ खर्चाला फाटा देत शिरूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) नितीन केणेकर यांनी आपल्या मुलाचा १७ वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अनाथांच्या सहवासात साजरा केला. मुलगा प्रणव याच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या बालगृहातील मुलांना पौष्टिक नाश्ता आणि ताजी फळे वाटप करून हा दिवस विशेष बनवण्यात आला.
सध्या वाढदिवसांवर होणारा भरमसाठ खर्च आणि पार्ट्यांची क्रेझ वाढत असताना केणेकर कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. प्रणवच्या १७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण कुटुंबाने आश्रमाला भेट दिली. यावेळी आश्रमातील मुलांसोबत संवाद साधत त्यांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
"सण, उत्सव किंवा वाढदिवस साजरे करताना समाजातील वंचित घटकांना सोबत घेतले, तर मिळणारे समाधान अवर्णनीय असते. मुलांमध्ये लहानपणापासूनच समाजभान आणि संवेदनशीलतेची रुजवण व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबवला," अशी प्रतिक्रिया यावेळी सपोनि नितीन केणेकर यांनी दिली.
या उपक्रमाबद्दल आश्रम प्रशासनाने आणि उपस्थित नागरिकांनी केणेकर कुटुंबीयांचे आभार मानत प्रणवला भावी आयुष्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले. पोलिस दलातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने दाखवलेल्या या संवेदनशीलतेची शिरूर शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.


