पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सांगवी कार्यालयात चालला होता ‘तोडपाणीचा घाट’, घरपट्टी कमी करायची दाखवली ‘आस’, लाचखोर लिपिक अडकला लाच लुचपतच्या जाळ्यात!
पुणे (प्रतिनिधी) -
इमारतीची नवीन मालमत्ता कर आकारणी कमी करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी कर संकलन विभागीय कार्यालयातील वर्ग-३ च्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत। उमेश सुबराव कुटे (वय ३७, रा. शुभ कलश सोसायटी, चिखली) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे।
काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय तक्रारदाराने पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागा खरेदी करून त्यावर तीन मजली इमारतीचे बांधकाम केले होते। या इमारतीची नवीन मालमत्ता कर (घरपट्टी) आकारणी करण्यासाठी त्यांनी २० ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सांगवी विभागीय कार्यालयात अर्ज दिला होता। त्यावेळी अर्जाची पडताळणी करताना लिपिक उमेश कुटे याने तक्रारदाराला, "तुमच्या इमारतीचा वार्षिक कर ९१,४७२ रुपये येईल, तो मी ५०,००० रुपयांच्या आत करून देतो," असे आमिष दाखवले।
दीड लाखांपासून सुरू झाली घासाघिस!
घरपट्टी निम्म्याने कमी करून देण्याच्या बदल्यात कुटे याने सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तडजोडीनंतर त्याने १ लाख ३० हजार रुपये मागितले। मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) गाठून २ सप्टेंबर रोजी रीतसर तक्रार दाखल केली।
‘एसीबी’चा सापळा आणि रंगेहाथ अटक!
तक्रारीच्या आधारे ३ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणीत कुटे याने लाचेची रक्कम १ लाख २० हजार रुपये घेण्याचे मान्य केले। त्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ आनंद नगर, सांगवी येथील स्विमिंग टँक रोड परिसरात सापळा रचला। दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून ठरलेली १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने कुटे याला रंगेहाथ ताब्यात घेतले।
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात आरोपी उमेश कुटे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुण्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे, पोलीस अंमलदार कैलास महामूलकर, अश्विन कुमकर आणि सहायक फौजदार अविनाश चव्हाण यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली।
लाच लुचपत विभागचे नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सअॅप क्र. ९४०३७८१०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले आहे।


