पत्त्यांचा डाव रंगला, दोन लाखांवरून वाद झाला! हरिश गंगावणेचा गोळीबाराने जीव गेला; शिरूर पोलिसांचा धाकच नाही राहिला!
शिरूर (प्रतिनिधी) - शिरूर शहरातील आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसर हादरला आहे. दोन लाख रुपये खिशातून काढल्याच्या कारणावरून विचारणा केल्याच्या वादातून पिस्तुलातून गोळी झाडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात हरिश दादाभाऊ गंगावणे (वय ३४, रा. कामाठीपुरा, शिरूर) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिरूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरातील लाटेआळी, आंबेडकरनगर येथे तोफिक अन्सारी यांच्या राहत्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. दोन लाख रुपये खिशातून काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या वादातून आरोपी रोहित रवींद्र सोनवणे याने जवळील पिस्तुलातून हरिश गंगावणे यांच्या कानामागे व मानेच्या उजव्या बाजूस गोळी झाडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत नमूद आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गंगावणे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अजिंक्य अंकुश जगताप (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०३, ३५१(२)(३), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ३(२५)(२७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात रोहित रवींद्र सोनवणे (रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे आणि आदित्य पवार (दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांची आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे.
अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना
घटनेनंतर आरोपींच्या अटकेसाठी शिरूर पोलीस ठाण्याची तीन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
पिस्तुलाचा वापर; मात्र हत्यार अद्याप जप्त नाही
या गुन्ह्यात पिस्तुलाचा वापर झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मात्र पिस्तुल अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याबरोबरच गोळीबारासाठी वापरण्यात आलेले हत्यार कुठून आले, ते कोणाच्या ताब्यात होते आणि ते जप्त करण्यास पोलिसांना कधी यश येते, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“पोलिसांचा धाकच नाही राहिला?” नागरिकांचा सवाल
शिरूर शहरात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा कितपत वचक आहे? रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या वाद-विवादांची माहिती पोलिसांच्या गस्तीपर्यंत पोहोचते का? आणि अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर वेळेत कारवाई होते का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा धाक कमी झाला असल्याचा निष्कर्ष काढण्यापेक्षा, तपास पूर्ण झाल्यानंतर नेमकी घटना कशी घडली, आरोपींकडे पिस्तुल कसे आले आणि पूर्वीच्या वादाची नेमकी पार्श्वभूमी काय होती, हे तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सपोनी केनेकर करीत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सपोनी दिवटे यांनी केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर या गोळीबारामागील नेमके कारण, पिस्तुलाचा स्रोत आणि घटनेपूर्वी झालेल्या वादाची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हरिश गंगावणे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून घटनेमागील संपूर्ण सत्य तपासातून समोर आणावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
“पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्यांचा डाव सुरू होता, तरी पोलिसांच्या नजरेत त्याचा ठाव नव्हता!
पत्त्यांच्या खेळातून वाद पेटला अन् गोळीबारात जीव गेला; मग रात्रीची गस्त आणि पोलिसांची खबरदारी नेमकी कुठे होती?
हा प्रकार पोलिसांच्या नजरेआड कसा राहिला? यामागे कोणाचे दुर्लक्ष होते का? आर्थिक हितसंबंधांचा काही संबंध होता का, याचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, अशा प्रकारांना आधीच आळा घालण्यासाठी पोलिसांचा धाक आणि गस्त प्रभावी असणे गरजेचे आहे!”
— जागृत शोध चा सवाल


