राजर्षी शाहू प्रतिष्ठानचा निर्धार! करूया महाराष्ट्र व्यसनमुक्त आणि मानसिक तणावमुक्त - भगवान श्रीमंदिलकर
अभियानात राज्यातील तरुणांनी सहभागी व्हावे - भगवान श्रीमंदिलकर
पुणे (प्रतिनिधी): आजचा तरुण हा देशाचा आणि राज्याचा खरा कणा आहे. मात्र, सध्याची बदलती जीवनशैली, वाढती स्पर्धा आणि कौटुंबिक समस्यांमुळे हा कणा व्यसन आणि मानसिक तणावाच्या विळख्यात अडकत चालला आहे. ही चिंताजनक परिस्थिती बदलण्यासाठी आणि महाराष्ट्राला सुदृढ बनवण्यासाठी 'राजर्षी शाहू प्रतिष्ठान' च्या वतीने सन २०२६ मध्ये संपूर्ण राज्यभर “व्यसनमुक्त आणि मानसिक तणावमुक्त महाराष्ट्र अभियान" राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील जास्तीत जास्त तरुणांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले कि,राजर्षी शाहू महाराजांच्या जनकल्याणाचा वारसा पुढे नेत, हे अभियान
केवळ जनजागृतीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीवर भर देणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात 'व्यसनमुक्ती दूत' नेमले जाणार असून, तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने गावोगावी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानाबाबत बोलताना भगवान श्रीमंदिलकर म्हणाले की, "आज रस्त्यावरचा कचरा साफ करण्यापेक्षा मनातील आणि शरीरातील व्यसनांचा कचरा साफ करण्याची अधिक गरज आहे. व्यसन आणि मानसिक तणाव हे दोन असे शत्रू आहेत जे हसती-खेळती घरे उद्ध्वस्त करत आहेत. आम्ही या अभियानाच्या माध्यमातून तरुणांना केवळ व्यसनमुक्त करणार नाही, तर त्यांना सरकारी योजना आणि ८०% स्थानिक रोजगाराच्या संधींशी जोडून सक्षम करणार आहोत. २०२६ हे वर्ष महाराष्ट्राच्या आरोग्याचे आणि आनंदाचे वर्ष ठरावे, हेच आमचे ध्येय आहे."
अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे राज्यव्यापी नेटवर्क,प्रत्येक गावात आणि शहरात व्यसनमुक्ती आणि तणावमुक्तीसाठी विशेष पथके निर्माण करणे.
डिजिटल जनजागृती माध्यमांचा वापर करून सोशल मीडिया आणि पॉडकास्टच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घराघरात पोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले
भगवान श्रीमंदिलकर पुढे म्हणाले की,समुपदेशन आणि मदत करून तरुण पिढीला या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.नैराश्यात असलेल्या तरुणांसाठी मोफत हेल्पलाइन आणि मार्गदर्शक सत्रे घेण्याची नियोजन आहे. शासन आणि प्रशासनाशी समन्वय साधून युवकांना शासन निर्णय (GR) माहिती देऊन त्यांना रोजगार संधींची उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जाणार असल्यास त्यांनी सांगितले.
या अभियानात सामाजिक कार्यकर्त्यांनी, डॉक्टरांनी, शिक्षकांनी आणि विशेषत युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ज्यांना या अभियानाचे समन्वयक म्हणून काम करायचे आहे किंवा ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी राजर्षी शाहू प्रतिष्ठानशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमंदिलकर यांनी केले आहे.
संपर्क:भगवान श्रीमंदिलकर (अध्यक्ष, राजर्षी शाहू प्रतिष्ठान) मोबाईल: ९५४५८९१५१५ तसेच आमच्या www.rajarshishahupratishthan.com वेबसाईट वर जाऊन अधिक माहिती घ्यावी.


