‘सूर्यघर’ व ‘स्मार्ट सोलर’ योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा : सभापती स्वाती घावटे
शिरूर पंचायत समिती कार्यालयात जनजागृती अभियान; माहिती किओस्कचे उद्घाटन
१७ ऑक्टोबरपर्यंत चालणार विशेष मोहीम; सौरऊर्जेचे फायदे, अनुदान व प्रक्रियेची मिळणार माहिती
शिरूर ( प्रतिनिधी ) -
स्वच्छ, हरित आणि ऊर्जा स्वयंपूर्ण महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांनी वीजबिलातील कायमस्वरूपी बचतीसाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ व ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप (स्मार्ट) सोलर योजने’चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन शिरूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे यांनी केले.
शिरूर पंचायत समिती कार्यालयात महावितरण व प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सौरऊर्जा जनजागृती उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. या उपक्रमांतर्गत नागरिकांना योजनांची सुलभ माहिती मिळावी, यासाठी पंचायत समिती आवारात उभारण्यात आलेल्या विशेष माहिती किओस्कचे उद्घाटन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
माहिती किओस्कद्वारे थेट मार्गदर्शन
नागरिकांना रूफटॉप सोलर बसवण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती, कार्यपद्धती, अर्ज प्रक्रिया तसेच केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान याबाबत या किओस्कद्वारे थेट मार्गदर्शन केले जात आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना सौरऊर्जेकडे वळवून त्यांना स्वयंपूर्ण बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती स्वाती घावटे यांच्यासह गटविकास अधिकारी (BDO) महेश डोके, महावितरण बारामती मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, शिरूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शरद माने, शिक्रापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, नोडल अधिकारी गणेश गोरे, संदेश पगारिया, थोरात मॅडम, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौरऊर्जा ही केवळ पर्यावरणापूरक नसून घरगुती अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी आहे, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन छतावर सौर प्रकल्प उभारावेत, असा सूर यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


