Ads
Ads

स्थानिक गुन्हे शाखेचा ४० लाखांच्या गांजावर छापा! शिरूर पोलिस ठाण्याचे DB पथक मात्र मारतंय नुसत्याच गप्पा!

स्थानिक गुन्हे शाखेचा ४० लाखांच्या गांजावर छापा! शिरूर पोलिस ठाण्याचे DB पथक मात्र मारतंय नुसत्याच गप्पा!

युवा पिढीला या अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे - संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण 

शिरूर (प्रतिनिधी) -

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर तालुक्यात धडक कारवाई करत तब्बल ४० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या कारवाईमुळे शिरूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या गुन्हे शोध पथकाचे (DB पथक) पितळ उघडे पडले असून, हे पथक केवळ गप्पा मारण्यात आणि सुस्त बसण्यात मग्न आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

 

''ड्रग्ज फ्री महाराष्ट्र'  आणि 'नशामुक्त भारत' मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीण भागात बेकायदेशीर अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) कडक कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली. शिरूर ते मंचर जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मौजे कवठे येमाई येथील इचकेवाडी येथे पोपट विठ्ठल शितोळे (वय ५२) याने आपल्या घरासमोर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (क्र. MH 12 HZ 0938) उभी केली असून, त्यात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर गांजा ठेवला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित छापा टाकला. या कारवाईत तब्बल ६१ किलोग्रॅम वजनाचा बेकायदेशीर गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी, असा एकूण ४० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी पोपट शितोळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक DB पथकावर प्रश्नचिन्ह; 'आंधळं दळतंय आणि...' अशी अवस्था!

स्थानिक पातळीवर अशा अवैध धंद्यांची खबरबात ठेवणे आणि गुन्हेगारांवर वचक बसवणे हे स्थानिक पोलीस ठाण्याच्या DB (Detection Branch) पथकाचे मुख्य काम असते. मात्र, शिरूर पोलीस ठाण्याच्या नाकाखाली इतक्या मोठ्या प्रमाणावर तब्बल ६१ किलो गांजा साठवून त्याची राजरोस देवाणघेवाण सुरू असताना स्थानिक पथकाला याचा थांगपत्ता कसा लागला नाही, हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे.

पुण्याहून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येऊन थेट आरोपीच्या घरासमोरून ४० लाखांचे घबाड पकडते, पण स्थानिक DB पथकाला मात्र आपल्याच हद्दीत काय चालले आहे याची साधी खबरही लागत नाही, यावरून DB पथकाचे दुर्लक्ष आणि निष्क्रियता समोर आली आहे. स्थानिक DB पथकाची ही कार्यपद्धती पाहून शिरूर परिसरातील नागरिक आता उघडपणे बोलू लागले आहेत की, "स्थानिक पोलिस ठाण्याचे DB पथक बिनकामाचे ठरले असून ते केवळ नुसत्याच गप्पा मारण्यात मग्न आहे!"

                   पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, युवा पिढीला या अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. परिसरात कोणीही अंमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक करत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव व ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोसई महेश डोंगरे, अंमलदार संजय पड्याळ, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील आणि सागर धुमाळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास आता शिरूर पोलीस करत आहेत.