‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी करणार: प्रितम पाटील (मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद)
स्वच्छता, कचरा वर्गीकरण, वृक्षारोपण आणि जलस्रोत संवर्धनावर विशेष भर
शिरूर (विशेष प्रतिनिधी):
स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक शिरूर घडविण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ व्यापक पातळीवर राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची एक मोठी लोकचळवळ उभी करण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे, असा विश्वास शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी व्यक्त केला. १७ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर भर
अभियानांतर्गत शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक संकुले, नदीकिनारे आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा वर्गीकरण तसेच घरगुती कंपोस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवून शहराला कचरामुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोत रक्षण
वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात हरित पट्टा निर्माण करण्यासाठी सोनार आळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून आगामी काळात शहरातील इतर भागांतही व्यापक लागवड केली जाणार आहे. तसेच जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात नदी व तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य संकलन करण्यात आले. संकलित निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार असून कचऱ्याचे मौल्यवान संसाधनात रूपांतर करण्याचा पर्यावरणपूरक मार्ग नगरपरिषदेने चोखपणे हाताळला आहे.
प्रशासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत
केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता या अभियानातून नागरिकांच्या सोयीसाठी अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली केली जात आहे. यामध्ये मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुलभ करणे, जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांचे वेळेत वाटप,महिला बचत गटांची अधिकृत नोंदणी, दिव्यांग नागरिकांना थेट ‘यू.आय.डी. कार्ड’ (UDID) वाटप शिबिरे
या सर्व उपक्रमांमुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गती आली असून शिरूरकरांना याचा थेट लाभ मिळत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच शिरूर शहर स्वच्छतेच्या नकाशावर अग्रस्थानी राहील, असा विश्वास मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी शेवटी व्यक्त केला.


