शिरूर पोलीस ॲक्शन मोडवर,
आमदाबाद फाटा येथील ‘हॉटेल ओंकार’वर पोलिसांचा छापा; बेकायदेशीर विदेशी दारूसह एकाला अटक, मुद्देमाल जप्त
शिरूर (प्रतिनिधी) - शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथील हॉटेल ओंकार येथे विनापरवाना व छुप्या पद्धतीने विदेशी दारू आणि बिअरची विक्री करणाऱ्या एका इसमावर शिरूर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत विविध नामांकित ब्रँडच्या बिअर व विदेशी दारूच्या बाटल्यांसह एकूण ८,८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश संजय देसाई (वय ४१ वर्षे, सध्या रा. हॉटेल ओंकार, आमदाबाद फाटा, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. फुंगुस, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी हाजी दूरक्षेत्र अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर यांना खात्रीशीर बातमी मिळाली होती की, आमदाबाद फाटा येथील ‘हॉटेल ओंकार’ येथे एक इसम ओळखीच्या ग्राहकांना बेकायदेशीरपणे विदेशी दारूची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक राकेश मुळीक, पोलीस अंमलदार संतोष मिसाळ, थोरे व खेडकर यांच्या पथकाने पंचांसह सापळा रचून सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान संशयित निलेश देसाई याच्या ताब्यातील एका लाल रंगाच्या पिशवीची झडती घेतली असता, त्यात ट्युबर्ग, किंगफिशर, बडवायझर, कार्लसबर्ग, बकार्डी अशा नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या व कॅन असा एकूण ४४ बाटल्यांचा (किंमत रु. ८,८३०/-) बेकायदेशीर साठा आढळून आला. या दारूविक्रीबाबत त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याने पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष अर्जुन मिसाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी निलेश देसाई याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करत आहेत.
"शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. हॉटेल्स, ढाबे किंवा इतर ठिकाणी छुप्या पद्धतीने दारूविक्री करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक व धडक कारवाई सुरू राहील. परिसरातील नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल."
— विनोद पाटील (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे)
"शिरूर उपविभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा आमचा निर्धार आहे. हॉटेल, लॉज किंवा धाब्यांच्या नावाखाली विनापरवाना दारूविक्री, जुगार अथवा इतर अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर मोक्का, हद्दपारी यांसारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येतील. अवैध धंदे चालवणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही."
— रवींद्र भोसले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग)


