तलाठी-कोतवालांनी केली १० लाखांच्या लाचेची मागणी; एसीबीच्या जाळ्यात अडकले अलगद!
पुणे (भगवान श्रीमंदिलकर) -
बांधकाम ठिकाणच्या इमारतीचा पाया खोदताना ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त खोदकाम झाल्याचा बनाव करून २ कोटी रुपयांचा दंड बसत असल्याची भीती दाखवत १० लाखांची लाच मागणाऱ्या शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील महिला तलाठी आणि कोतवालावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७, पद- तलाठी, शिवाजीनगर तलाठी कार्यालय) आणि महेश मधुकर मुंढे (वय ३०, पद- कोतवाल, शिवाजीनगर तलाठी कार्यालय) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
तक्रारदार (वय ३७) हे व्यवसाय खोदकाम कंत्राटदार आहेत. त्यांच्या फर्मकडून सेनापती बापट रोड, पुणे येथील सर्व्हे नं. ९६७ या ठिकाणी एका कमर्शियल
प्रोजेक्टच्या इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू होते. या कामाचा पंचनामा तलाठी आश्विनी कोकाटे यांनी केला होता. पंचनामा करताना तक्रारदारांनी ३२०० ब्रास जास्त खोदकाम केल्याचे सांगून, त्यावर २ कोटी रुपयांचा दंड बसू शकतो, अशी भीती त्यांनी दाखवली. हा दंडाचा विषय मिटवून तहसीलदारांकडे 'निल पंचनामा' अहवाल सादर करण्यासाठी कोकाटे यांनी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध
याप्रकरणी तक्रारदाराने १५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) येथे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार १६ जून २०२६ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान, तलाठी आश्विनी कोकाटे यांनी निल अहवाल देण्यासाठी १० लाखांची मागणी करून ती रक्कम कोतवाल महेश मुंढे याच्याकडे देण्यास सांगितले. तसेच कोतवाल महेश मुंढे यानेही ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
या पडताळणीनंतर ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी १६:३३ वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ आणि १२ अन्वये गु. रजि. क्रमांक २०५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीमती आसावरी शेडगे, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके तसेच अंमलदार विकास आडके, वैशाली माकर आणि दीपक काकडे यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.


