वडापाव आणि पैशांचे आमिष दाखवून केला अत्याचार; पोक्सो व अॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करत शिरूर पोलिसांचा दणका, आरोपीला ठोकल्या बेड्या!
शिरूर (प्रतिनिधी) :
शिरूर तालुक्यातील अनोसेवाडी परिसरात अवघ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खाऊ आणि पैशांचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो (POCSO) आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे नोंदवून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी–अनोसेवाडी हद्दीत फेब्रुवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान हा किळसवाणा प्रकार घडला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे पूर्णपणे ठाऊक असतानाही आरोपी श्रीरंग ठकाजी अनोसे (वय अंदाजे, रा. अनोसेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याने तिला गाठले. आरोपीने पीडितेला वडापाव आणि पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या राहत्या घरी नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली, ज्यामुळे पीडिता प्रचंड दहशतीखाली होती.
वैद्यकीय तपासणीत फुटले बिंग
गेल्या काही दिवसांत पीडितेच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तिला तपासणीसाठी नेले. त्यावेळी डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत (MLC) पीडित मुलगी सुमारे ७ ते ८ महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. हा धक्कादायक अहवाल समोर येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार उघड केला व शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
पीडितेच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ७९७/२०२६ नुसार:
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६४(२) (बलात्कार), १२७(२), ३५१(२), ३५१(३) (धमकी देणे)
बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) कायदा: कलम ४, ६, ८, १२
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अॅट्रॉसिटी प्रतिबंधक) कायदा: कलम ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii), ३(२)(v), ३(१)(s) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गुन्ह्याची नोंद होताच शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून नराधम आरोपी श्रीरंग अनोसे याला तातडीने ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. गुन्हा दाखल करण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर यांनी केले असून, घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) रवींद्र भोसले स्वतः करत आहेत. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या या क्रूर अत्याचारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नराधमाला कठोर शिक्षेची मागणी नागरिकांमधून होत आहे.
मा.विनोद पाटील (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे)
"महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत शिरूर पोलीस कोणतीही हयगय करणार नाहीत. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसेल अशीच कठोर कारवाई केली जाईल. समाजात अशा प्रकारच्या घटना कुठेही घडत असल्यास नागरिकांनी न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा. या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील कायदेशीर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे."
मा. रवींद्र भोसले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग - तपासी अधिकारी)
"अल्पवयीन मुलीवर झालेला हा अत्याचार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पोक्सो, अॅट्रॉसिटी आणि BNS च्या कडक कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली आहे. या गुन्ह्याचा सर्व बाजूंनी सखोल आणि तांत्रिक तपास सुरू असून, पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आणि नराधम आरोपीला न्यायालयात कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा केले जात आहेत."


