Ads
Ads

"वाघोलीत रचला सापळा भारी, मोकोकाचा गँगलीडर मचाले गेला जेलच्या दारी!" शिरूर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाची कामगिरी भारी!

 

"वाघोलीत रचला सापळा भारी, मोकोकाचा गँगलीडर मचाले गेला जेलच्या दारी!"

शिरूर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाची कामगिरी भारी!

शिरूर (प्रतिनिधी) -

मोकोका (MCOCA) अंतर्गत गंभीर गुन्ह्यात मागील ७ महिन्यांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार असलेला कुख्यात टोळीप्रमुख योगेश केशव मचाले याला शिरूर पोलिसांच्या तपास (DB) पथकाने अत्यंत शिताफीने वाघोली परिसरातून जेरबंद केले आहे. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून पोलिसांचे जोरदार कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर भरवण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर फोटो न लावल्याच्या वादातून फिर्यादी मिथुन उर्फ अमोल आनंदा चौगुले यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करत दगडफेक व शिवीगाळ करण्यात आली Image होती. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम, शस्त्र कायदा तसेच संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोकोका) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या योगेश केशव मचाले (रा. मांडवगण फराटा) हा गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. दरम्यान, आरोपी मचाले हा वाघोली येथील खांदवेनगर भागात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस हवालदार विनोद मोरे आणि पोलिस अंमलदार सुशिल सुरवसे यांना मिळाली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वात तातडीने तपास पथक रवाना करण्यात आले. पोलिसांनी खांदवेनगर येथे सापळा रचला होता. संशयित योगेश मचाले तेथे येताच त्याला पोलिसांची चाहूल लागली आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्याला जागीच पकडले.

धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्या टोळीप्रमुख योगेश मचाले याच्यावर यापूर्वीही खंडणी, गंभीर मारहाण आणि खुनाचा प्रयत्न करण्यासारखे अनेक दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल आहेत.

सदरची धडक कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हवालदार विनोद मोरे, राहुल भवर, शरद वारे, अक्षय कळमकर तसेच अंमलदार सुशिल सुरवसे, निखिल रावडे, दादाराव नागरे, नितेश थोरात, नीरज पिसाळ, विजय शिंदे, सचिन भोई, अंबादास थोरे, अजय पाटील, रवींद्र काळे आणि वैभव शेलार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

 

​"शिरूर परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. संघटित गुन्हेगारी, खंडणीखोरी आणि दहशत पसरवणाऱ्या समाजकंटकांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. फरार टोळीप्रमुखाला जेरबंद करून आमच्या पथकाने धडक कारवाई केली असून, भविष्यातही गुन्हेगारांवर अशीच कठोर आणि मोकोकासारखी कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील."

​— विनोद पाटील

(पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे)

 

​"शिरूर उपविभागात संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्ध आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मोकोका अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुखाला जेरबंद करून शिरूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. या गुन्ह्याचा तपास अत्यंत बारकाईने आणि कायदेशीर बाबी तपासून केला जात आहे. सर्वसामान्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करणे हेच आमचे उद्दिष्ट असून, फरार असणाऱ्या इतर गुन्हेगारांचाही लवकरच बंदोबस्त केला जाईल."

  

​— रवींद्र भोसले

(उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग)