आमदाबाद येथील जिल्हा परिषदेची शाळा आता होणार स्मार्ट स्कूल
शिरूर (प्रतिनिधी ) - आमदाबाद तालुका शिरूर येथील तरुणांनी गावातील शाळा स्मार्ट स्कूल मध्ये रूपांतरीत करण्याचा संकल्प केला असून या संकल्पपूर्ती करिता गावातील काही प्रमुख अनुभवी प्राथमिक शिक्षक व गावातील माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज जालिंदरनगर तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे येथील जगातील पहिल्या क्रमांकाची शाळा असलेली जिल्हा परिषद शाळा व या शाळेत कार्यरत असलेले श्री वारे गुरुजी आणि त्यांच्याबरोबर योगदान देणारे सहकारी यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आज आमदाबाद येथील एका शिष्टमंडळाने भेट दिली. आणि या ठिकाणी होत असलेला मुलांचा बौद्धिक विकास व त्याकरिता होणारे मार्गदर्शन योग्य असल्याने आपल्याही गावातील शाळा याप्रमाणे स्मार्ट स्कूलमध्ये रूपांतरित होण्याच्या करिता, शिष्ट मंडळातील तरुणांनी आग्रहाची
भूमिका मांडली त्यामध्ये वारे गुरुजी यांनीही आवश्यक त्या बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन देण्याचे कबूल केले. शिष्टमंडळात असलेल्या तरुण ग्रामस्थ व शिक्षकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्रात मराठी शाळा टिकल्या पाहिजेत याकरिता ग्रामीण भागात असलेल्या सरकारी शाळा टिकणे आवश्यक आहे जर या प्राथमिक शिक्षणाच्या सोयीपासून समाज वंचित राहिला तर पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या समाजाच्या वाट्याला व्यसनाधीनता, दारिद्र्य हे ठरलेलेच असेल आणि त्याचा परिणाम समाजावर होऊन बंद झालेल्या शाळां ऐवजी सरकारला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कारागृह बांधावी लागतील. म्हणून समाजातील सर्व घटकांनी ग्रामीण भागातील मराठी शाळा टिकण्याकरिता प्राधान्यक्रमाने काम केले पाहिजे. देव धर्माच्या नावाखाली दर वर्षाला सामान्य व्यक्तीकडूनही मोठ्या प्रमाणावर वर्गणी जमा केली जाते व त्याचा उपयोग समाजास किती होतो हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.असे मत शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त नितीन थोरात यांनी व्यक्त केले.
आपल्या गावातील शाळेसाठी यापुढील काळात योगदान देऊन पुढील पिढी स्मार्ट करण्याच्या करिता यापुढे धार्मिक कार्यक्रमांना देणगी देण्याऐवजी शैक्षणिक कार्यासाठी देणगी देणे केव्हाही हिताचे असू शकते या विचाराने आलेल्या अनेकांनी या कामाची सुरुवात रोख रक्कम देऊन केली
आज जालिंदर नगर शाळेत भेट देण्यासाठी गावातील माजी सरपंच पोपटराव घुले ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री अविनाश सोनार, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नितीन पवार, तरुण मंडळाचे अध्यक्ष केशव दादा पवार दिलीप घुले ज्ञानेश्वर शिरसागर व्हाईस चेअरमन बंडा बापू थोरात शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष विजय दादा साळवे, माजी सैनिक भाऊसाहेब जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गागरे गुरुजी व त्यांचे सहकारी श्री ज्ञानेश्वर नरवडे गुरुजी, श्री टिळेकर गुरुजी, श्री गोपीनाथ जाधव गुरुजी, श्री फक्कड गुरुजी आणि गावातील पांडुरंगआणणा थोरात माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती थोरात व त्यांचा शिक्षक वृंद उपस्थित होते


