सासवड पोलिसांची दमदार कामगिरी; मोक्कातील सराईत आरोपी गावठी पिस्तूलासह गजाआड!
पुणे (प्रतिनिधी):
सासवड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक धडक आणि यशस्वी कारवाई करत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई झालेल्या एका सराईत गुन्हेगाराला शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन आणि दुचाकी असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रोहित राजू माने (वय २४ वर्षे, रा. गुजरवाडी, दत्तनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सासवड गावाच्या हद्दीत हिवरे रोडवरील सैनिक कॅन्टिनच्या पाठीमागे एक इसम काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलसह (क्रमांक MH 12 TL 8796) संशयास्पदरीत्या थांबला आहे.
माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे मोटारसायकलवर संशयितरीत्या बसलेल्या इसमाकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय बळावल्याने त्यांनी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता, त्याने आपले नाव रोहित माने असल्याचे सांगितले आणि दुचाकीच्या टूल बॉक्समध्ये पिस्तूल लपवून ठेवल्याची कबुली दिली.
९६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दोन पंचांना बोलावून त्यांच्या समक्ष दुचाकीचा टूल बॉक्स उघडला असता, त्यामध्ये ५० हजार रुपये किमतीचे एक स्टील-लोखंडी बॉडीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि १ हजार रुपयांचे स्टील मॅगझिन मिळून आले. पोलिसांनी पिस्तूल, मॅगझिन आणि ४५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (ज्यावर पाठीमागील नंबर प्लेटवर 'महाकाल' असे लिहिलेले होते) असा एकूण ९६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेला आरोपी रोहित माने हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत:
लोणीकंद पोलीस ठाणे: जबरी चोरी व ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा.
कोंढवा पोलीस ठाणे: घरफोडी व चोरीचा गुन्हा.
खडक पोलीस ठाणे: चोरीचा गुन्हा.
वाघोली पोलीस ठाणे: बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा.
सदरची धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे, पोलीस हवालदार दत्तात्रय काळे, पोहवा जाधव, पोलीस नाईक गोकुळ हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे आणि प्रवीण शेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करत आहेत.


