भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी शिरूर येथील ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते राजूभाई शेख यांची निवड
शिरूर (प्रतिनिधी ) - भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी शिरूर येथील ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते राजूभाई शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे अधिकृत पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
राजूभाई शेख हे मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, जिल्हा पातळीवरही संघटनात्मक काम केले आहे. राजकारणासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने अग्रभागी असतात.
प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करताना केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक बांधवांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार
असल्याचे राजूभाई शेख यांनी सांगितले. तसेच शासनाच्या विविध योजना आणि त्यांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शेख यांच्या निवडीबद्दल शिरूर तालुका भाजप अध्यक्ष राहुल पाचर्णे, माजी सरपंच वर्षा काळे, भाजपचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, भाजप नेते धर्मेंद्र खांडरे, रेश्मा शेख, विजय नरके यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


