Ads
Ads

ब्लास्टिंगच्या हादऱ्यांनी मलठण बेजार; स्फोटांमुळे भेगा, धुळीने फळबागांचा उडाला बाजार! स्टोनक्रशरच्या मनमानीमुळे हजारो फळझाडे उद्ध्वस्त

ब्लास्टिंगच्या हादऱ्यांनी मलठण बेजार; स्फोटांमुळे भेगा, धुळीने फळबागांचा उडाला बाजार!

स्टोनक्रशरच्या मनमानीमुळे हजारो फळझाडे उद्ध्वस्त; कंपाउंड कोसळले, जमीन खचली

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप; प्रत्यक्ष पंचनामे करून कठोर कारवाई व नुकसानभरपाईची मागणी

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) :

शिरूर तालुक्यातील मलठण परिसरात सुरू असलेल्या स्टोनक्रशर आणि खाणपट्ट्यांमधील बेसुमार ब्लास्टिंग व अव्याहत उत्खननामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे. क्षमतेपेक्षा अधिक तीव्रतेच्या ब्लास्टिंगच्या हादऱ्यांनी शेतजमिनी खचून त्यांना मोठ्या भेगा पडत आहेत, तर क्रशरमधून उडणाऱ्या पांढऱ्या धुळीच्या थरामुळे आंबा, चिकू, पेरू यांसारख्या हजारो फळझाडांचा अक्षरशः बाजार उठला आहे. या गंभीर प्रकाराबाबत खासगी बांधकाम व्यावसायिक विलास थानमल पालरेषा यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच पोलिस प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत तातडीने प्रत्यक्ष पाहणी व कारवाईची मागणी केली आहे.

स्फोटांचे हादरे अन् जमिनीला भेगा

मलठण परिसरातील पालरेषा यांच्या जमिनीलगत भाऊसाहेब पाचंगे यांच्या ‘भाग्यलक्ष्मी स्टोनक्रशर’मध्ये मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग व दगड उत्खनन सुरू आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, या खाणींमध्ये ब्लास्टिंग करताना सुरक्षित अंतराचे व क्षमतेचे कोणतेही शासकीय नियम पाळले जात नाहीत. स्फोटांची तीव्रता इतकी भयानक असते की जमिनी हादरून आजूबाजूचे संरक्षक कुंपण (कंपाउंड) जागोजागी कोसळले आहे. कित्येक ठिकाणी शेतजमीन खचली असून जमिनीला लांबलचक भेगा पडल्या आहेत. भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

धुळीचे साम्राज्य, हजारो झाडे सुकली

स्टोनक्रशरमधून २४ तास हवेत उडणाऱ्या बारीक धुळीचा थेट तडाखा परिसरातील शेती व फळबागांना बसला आहे. आंबा, चिकू, पेरू, जांभूळ आदी विविध प्रकारच्या हजारो झाडांवर धुळीचे जाड थर साचल्याने झाडांची वाढ खुंटली आहे. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया थांबल्यामुळे पाने जळून खाक झाली असून झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. वर्षानुवर्षे पोटच्या पोरासारख्या वाढवलेल्या फळबागा डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने संबंधित शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

पर्यावरणीय अटींना केराची टोपली

दगडखाण आणि क्रशर उद्योगाला परवानगी देताना प्रशासनाकडून अनेक कडक अटी-शर्ती घातल्या जातात. यात प्रामुख्याने:

 * क्रशर परिसरात धूळ उडू नये म्हणून नियमित पाण्याचे फवारे मारणे (Water Sprinklers),

 * खाणीच्या चहूबाजूंनी हरित पट्टा निर्माण करण्यासाठी दाट वृक्षलागवड करणे,

 * स्फोटांची तीव्रता मर्यादित ठेवणे व सुरक्षित अंतर राखणे,

 * खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री झाकणे.

मात्र, मलठण येथील संबंधित खाणपट्ट्यात या सर्व नियमांना उघडपणे केराची टोपली दाखवण्यात आली आहे. पाण्याचा वापर न करता कोरडेच क्रशर चालवले जात असल्याने आणि डंपर बेदरकारपणे धावत असल्याने रस्त्यांवर सतत धुळीचे लोट पसरलेले असतात.

प्रशासनाचे दुर्लक्ष; आंदोलन छेडण्याचा इशारा

या समस्येबाबत यापूर्वीही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते; परंतु अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे क्रशरचालकांचे फावले असून परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाला पुन्हा स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे.

महसूल, पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, खाणींच्या परवानग्या व ब्लास्टिंग नियमावलीची काटेकोर तपासणी करावी, दोषींवर तात्काळ दंडात्मक व फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अधिकृत पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी विलास पालरेषा व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. वेळीच कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.