Ads
Ads

डीजेला फाटा, भक्तीचा थाट; टाळ-मृदंगाच्या गजरात बाप्पाचा जयजयकार; पोलीस निरीक्षक विनोद पाटलांच्या उपस्थितीत परभणेवाडीने धरली वारकरी वाट!

डीजेला फाटा, भक्तीचा थाट; टाळ-मृदंगाच्या गजरात बाप्पाचा जयजयकार; पोलीस निरीक्षक विनोद पाटलांच्या उपस्थितीत परभणेवाडीने धरली वारकरी वाट!

शिरूर (प्रतिनिधी) —

सध्याच्या काळात गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डीजे आणि लेझर लाईट्सची वाढती स्पर्धा पाहायला मिळत असताना, शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई अंतर्गत परभणेवाडी येथील हनुमान गणेश मंडळाने मात्र या विकृतीला छेद देत एक अनोखा आणि कौतुकास्पद आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आधुनिक काळातील डीजे आणि ध्वनिक्षेपकाच्या दणदणाटाला पूर्णपणे फाटा देत, मंडळाने अस्सल वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने, टाळ-मृदंगाच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढली.

दिनांक २५ सप्टेंबर रोजी परभणेवाडीत संपन्न झालेल्या या विसर्जन मिरवणुकीत संपूर्ण गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाऐवजी हरिनामाचा गजर, अभंग आणि टाळ-मृदंगाच्या नादाने परिसर दुमदुमून गेला.

पोलीस निरीक्षकांकडून कौतुक आणि प्रत्यक्ष सहभाग

या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल घेत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद पाटील यांनी विसर्जन मिरवणुकीला प्रत्यक्ष सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी हनुमान गणेश मंडळाच्या या पर्यावरणपूरक आणि संस्कृती संवर्धक निर्णयाचे मनापासून कौतुक करत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान केला. केवळ भेट देऊन न थांबता, पोलीस निरीक्षक पाटील यांनी स्वतः या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह द्विगुणित केला.

इतर मंडळांनीही आदर्श घ्यावा : पोलीस निरीक्षक विनोद पाटील

या प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक विनोद पाटील म्हणाले, “गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. डीजेच्या अतिवापरामुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि त्यातून निर्माण होणारे वाद टाळून, हनुमान गणेश मंडळाने पारंपरिक वारकरी पद्धतीने विसर्जन सोहळा साजरा केला, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. यामुळे शांतता आणि सलोखा राखण्यास मोठी मदत होते. शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर गणेश मंडळांनीही असाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून टाळ-मृदंग, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून पारंपरिक विसर्जन मिरवणुका काढाव्यात.”

हनुमान गणेश मंडळाने घेतलेल्या या पुरोगामी आणि संस्कृतीरक्षक भूमिकेचे शिरूर पोलीस प्रशासनासह पंचक्रोशीतील नागरिकांकडून जोरदार स्वागत होत असून, परभणेवाडीच्या या उपक्रमाची सर्वत्र मोठी चर्चा रंगली आहे.