डॉक्टरांच्या चिठ्ठीला केराची टोपली; नशायुक्त गोळ्या आणि ॲन्टिबायोटिक्सची सर्रास होते विक्री!
मेडिकलमधून 'ओव्हर द काउंटर' धोकादायक खेळ; शिरूर परिसरातील तरुणाई कफ सिरप अन् पेनकिलर्सच्या आहारी!
शिरूर (भगवान श्रीमंदिलकर ) -
तीव्र वेदना शमवण्यासाठी किंवा संसर्गावर मात करण्यासाठी बनवलेली औषधे आज चक्क नशेचे साधन बनत आहेत. कायद्यानुसार डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय (Prescription) एकाही गोळीची विक्री करता येत नसताना, शिरूर शहर आणि परिसरातील काही मेडिकल स्टोअर्समधून शेड्युल H आणि H1 प्रकारातील नशायुक्त औषधे, कफ सिरप आणि उच्च क्षमतेची ॲन्टिबायोटिक्स 'मागितली की लगेच' दिली जात आहेत. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी चाललेला हा गैरव्यवहार तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत ढकलत असून, सर्वसामान्यांचे आरोग्यही धोक्यात आणत आहे.
कोडीन सिरप आणि झोपेच्या गोळ्यांची छुप्या मार्गाने विक्री
खोकल्यावर गुणकारी ठरणारे कोडीनयुक्त कफ सिरप (Codeine Phosphate Syrup)
आणि अल्प्राझोलम (Alprazolam), झोल्पीडेम (Zolpidem), ट्रामाडोल (Tramadol) यांसारख्या झोपेच्या व वेदनाशामक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक मेडिकल चालक जादा दराने ही औषधे नशेसाठी तरुणांना विकत असल्याचे वास्तव आहे.
दारूचा वास येत नाही आणि सहज उपलब्ध होते म्हणून शाळकरी मुले व महाविद्यालयीन युवक या गोळ्या व सिरपच्या विळख्यात अडकत आहेत. रात्रीच्या वेळी ठरावीक मेडिकलच्या मागे किंवा अडगळीच्या भागात अशा ग्राहकांची होणारी गर्दी या गोरखधंद्याची साक्ष देते.
ॲन्टिबायोटिक्सचा अतिरेक; भविष्यातील मोठा धोका (AMR)
दुसरीकडे, साध्या सर्दी, खोकला किंवा तापासाठीही थेट तिसऱ्या पिढीतील महागडी ॲन्टिबायोटिक्स जसे कि सेफिक्सिम, अझिथ्रोमायसिन, ओफ्लॉक्सासिन अश्याप्रकारचे औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गरज नसताना किंवा अर्धवट डोस घेतल्यामुळे शरीरातील जंतूंमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते (Antimicrobial Resistance - AMR). परिणामी, भविष्यात एखादा गंभीर आजार झाल्यावर ही औषधे रुग्णावर अजिबात लागू पडत नाहीत.
शेड्युल H1 रजिस्टर फक्त कागदोपत्री!
शासनाच्या नियमानुसार शेड्युल H1 औषध विकताना रुग्णाचे नाव, डॉक्टरांचे नाव, औषधाचा बॅच नंबर नोंदवणे आणि त्या नोंदी किमान ३ वर्षे जतन करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात बहुतांश मेडिकलमध्ये हे रजिस्टर कपाटात धूळ खात पडून असते. FDA तपासणीला येणार असल्याचे समजताच मागच्या तारखा टाकून बोगस नोंदी भरल्या जातात किंवा ओळखीच्या डॉक्टरांची नावे परस्पर खपवली जातात.
कायद्याचा बडगा काय सांगतो?
NDPS कायदा: कोडीन सिरप किंवा नशायुक्त गोळ्यांचा विनानोंद साठा किंवा काळाबाजार आढळल्यास अमली पदार्थ कायद्यांतर्गत (NDPS) अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन १० वर्षांपर्यंत सक्तमजुरी होऊ शकते.
ड्रग्स ॲक्ट प्रिस्क्रिप्शनशिवाय शेड्युल H व H1 औषधांची विक्री केल्यास मेडिकलचा परवाना जागीच निलंबित किंवा कायमचा रद्द करण्याची तरतूद आहे.
कच्ची चिठ्ठी, रोकड व्यवहार अन् बिलांना बगल
अशा नशायुक्त आणि शेड्युल औषधांची विक्री करताना दुकानदार संगणकीय बिल (Computer Bill) देणे पूर्णपणे टाळतात. साध्या कागदावर किंमत लिहून रोख पैसे घेतले जातात, जेणेकरून अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत खरेदी आणि विक्रीच्या साठ्याचा ताळेबंद दाखवताना ही विक्री सहज लपवता येते.


