Ads
Ads

एकाच पोलीस ठाण्यात २४ तासांत एसीबीचे दोन मोठे दणके: एका हवालदाराला रंगेहाथ बेड्या, तर दुसरा लाचेच्या रकमेसह पसार; वरिष्ठांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

एकाच पोलीस ठाण्यात २४ तासांत एसीबीचे दोन मोठे दणके: एका हवालदाराला रंगेहाथ बेड्या, तर दुसरा लाचेच्या रकमेसह पसार; वरिष्ठांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

शिरूर पोलिसांत लाचखोरीची लागली कीड; बनकर गजाआड, तर मुंढे ९५ हजारांसह अंधारात फरार होऊन नामोहरम झाली खाकीची भीड!

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) :

शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा धक्कादायक प्रत्यय सलग दोन कारवायांमधून समोर आला आहे. दाखल गुन्ह्यात मदत करणे आणि अटक टाळण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांची पिळवणूक करणाऱ्या दोन वेगवेगळ्या पोलीस हवालदारांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एकाच वेळी कारवाईचा बडगा उगारला. यात एका कारवाईत हवालदार शिवाजी बनकर याला लाच स्वीकारताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या, तर दुसऱ्या कारवाईत हवालदार सतीश मुंढे हा चक्क ९५ हजार रुपयांची लाच घेऊन अंधाराचा फायदा घेत फरार झाला. विशेष म्हणजे, मुंढे याने लाच मागताना वरिष्ठांचेही नाव घेतल्याचे निष्पन्न झाल्याने शिरूरच्या पोलीस निरीक्षकांना सहआरोपी करणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

प्रकरण १: नोटीस देण्यासाठी लाचेची हाव; हवालदार शिवाजी बनकर रंगेहाथ गजाआड!

शिरूर पोलीस ठाण्यात एका २९ वर्षीय तक्रारदारासह त्यांच्या आई-वडिलांच्या विरोधात १९ ऑगस्ट रोजी बीएनएस कलम ३२९(३), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास हवालदार शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४, ब. नं. २४३६, रा. स्वप्नपूर्ती निवास, घोलेगाव रोड, शिरूर) याच्याकडे होता. बनकर याने आरोपींना अटक न करता कायदेशीर नोटीस देण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी १५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

पैसे दिल्याशिवाय नोटीस देणार नाही अशी भूमिका घेतल्याने तक्रारदाराने अटकेच्या भीतीने बनकर याला यापूर्वीच ५,००० रुपये दिले होते. त्यानंतर उर्वरित १०,००० रुपयांसाठी तगादा लावण्यात आला. तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी जुने शिरूर पोलीस ठाणे येथे लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यात बनकर याने आधी ४,००० रुपये घेतल्याचे मान्य करत उर्वरित ११,००० रुपयांची मागणी केली.

त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी जुने शिरूर पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्याच्या कडेला रात्री ९:३३ वाजता तक्रारदाराकडून ११,००० रुपयांची उर्वरित लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने हवालदार शिवाजी बनकर याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण २: तब्बल ९५ हजारांची लाच; हवालदार सतीश मुंढे पैशांसह पसार!

ही कारवाई ताजी असतानाच शिरूरमध्ये दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला. ५९ वर्षीय तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १२६(२), ३०३(२), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार सतीश नाथाराव मुंढे (वय ४५) याच्याकडे होता. मुंढे याने गुन्ह्यात मदत करण्यासाठी व अटक न करण्यासाठी सुरुवातीला १ लाखाची मागणी केली होती.

३० सप्टेंबर रोजी एसीबीने टाकळी हाजी पोलीस चौकी येथे केलेल्या पडताळणीत हवालदार मुंढे याने स्वतःसाठी व वरिष्ठांच्या नावाने तडजोडीअंती ९५ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. रात्रीच्या वेळी टाकळी हाजी पोलीस चौकी येथे तक्रारदाराकडून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच मुंढे याला एसीबीच्या सापळ्याची चाहूल लागली. पथक पकडणार हे लक्षात येताच मुंढे लाचेच्या रकमेसह अंधाराचा फायदा घेऊन तिथून पसार झाला. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व बीएनएस कलम २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शिरूरच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई होणार का?

हवालदार सतीश मुंढे याने ९५ हजारांची लाच घेताना केवळ स्वतःचाच नव्हे, तर 'वरिष्ठांच्या नावाचा' स्पष्ट उल्लेख केल्याचे एसीबीच्या पडताळणीत समोर आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील नेमक्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी हे पैसे गोळा केले जात होते? लाचेत वाटा असणाऱ्या शिरूरच्या पोलीस निरीक्षकांना एसीबी या गुन्ह्यात सहआरोपी करणार का? या प्रश्नांनी शिरूर तालुक्यासह संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

कारवाई करणारे पथक व आवाहन

या दोन्ही कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील व उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. पहिल्या कारवाईत पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे, पो.शि. अश्विन कुमकर, पो.शि. विकास आडके, चालक पो.हवा. सोनवणे यांनी कामगिरी बजावली; तर दुसऱ्या कारवाईत पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे, पो.हवा. प्रवीण तावरे, पो.शि. बाळासाहेब गदादे आणि चालक ऋषिकेश अभंग यांनी सहभाग घेतला.

शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता एसीबीच्या १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.