Ads
Ads

एमडी माफियांची नावं दाबली, पत्त्यांच्या वादात एकाचा जीव गेला; शिरूर गुन्हेगारीच्या विळख्यात असताना SP साहेबांचं विनोद पाटलांवर एवढं प्रेम का दाटलं?

एमडी माफियांची नावं दाबली, पत्त्यांच्या वादात एकाचा जीव गेला; शिरूर गुन्हेगारीच्या विळख्यात असताना SP साहेबांचं विनोद पाटलांवर एवढं प्रेम का दाटलं?

अमली पदार्थांचे रॅकेट, ‘मार्वेल इन’मधील अत्याचार अन् भरदिवसा गोळीबार; खाकीचा वचक संपला, पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी कराच जनतेतून  होते तीव्र मागणी!

 

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) –

शिरूर शहर आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या गंभीर गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्यांचे जगणे असुरक्षित झाले असून कायद्याचे राज्य उरले आहे की नाही, असा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्जचे उघड रॅकेट, नामांकित हॉटेल्समधील लैंगिक अत्याचार, लाखो रुपयांचा गांजा साठा आणि किरकोळ वादातून भरदिवसा झालेला गोळीबार या सर्व घटनांनी शिरूरची शांतता पूर्णपणे भंग केली आहे. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या गंभीर घटनांमुळे शिरूर पोलिसांची कार्यक्षमता आणि हेतू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोलीस ठाण्याचा कारभार ढिम्म असताना, गुन्हेगारांवर कसलाही वचक न उरल्याने पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक नक्की कोणाच्या दबावाखाली पाठीशी घालत आहेत, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक आणि सामाजिक संघटना उघडपणे विचारत आहेत.

‘मार्वेल इन’मध्ये ड्रग्ज अन् बलात्कार; मालकाला कोणाचे अभय?

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ‘हॉटेल मार्वेल इन’मध्ये घडलेल्या दोन घटनांनी संपूर्ण तालुका हादरला होता. अवघ्या ४८ तासांच्या अंतरात याच हॉटेलवर धाड पडून ९ लाख रुपयांचे २० ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत झाले. या कारवाईची शाई वाळते न वाळते तोच, याच हॉटेलच्या एका खोलीत तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली.

एकाच छताखाली सलग दोन गंभीर गुन्हे घडूनही हॉटेल व्यवस्थापन आणि मालकावर सहआरोपी म्हणून ठोस कारवाई करण्याचे धाडस स्थानिक पोलिसांनी दाखवले नाही. हॉटेलमध्ये संशयितांची ओळखपत्रे तपासली गेली होती का, सीसीटीव्ही सुरू होते की जाणीवपूर्वक बंद ठेवले गेले होते, या मूलभूत बाबींची निष्पक्ष चौकशी करण्याऐवजी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. स्थानिक पातळीवरील एका मातब्बर राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळेच हॉटेल मालकाला क्लीन चिट देण्याचा डाव आखला गेला का, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे.

१३ तस्करांची नावे तपासात निष्पन्न, तरीही पोलिसांकडून पांघरूण!

शिरूर शहर, शिक्रापूर आणि लगतच्या परिसरात तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘एमडी’ ड्रग्जच्या जाळ्याबाबत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या रॅकेटमध्ये गुंतलेल्या तब्बल १३ बड्या तस्करांची आणि पुरवठादारांची नावे पुराव्यानिशी पोलिसांच्या हाती लागली होती.

मात्र, या टोळीचा समूळ नायनाट करण्याऐवजी पोलिसांनी केवळ एका लहान माशावर कारवाई दाखवून उर्वरित १३ सराईत गुन्हेगारांची नावे एफआयआरमधून आणि जनतेच्या नजरेतून गुप्त ठेवणे पसंत केले. यावरून कोट्यवधींच्या आर्थिक तडजोडीपोटीच मुख्य तस्करांचे पत्ते झाकण्यात आल्याचा थेट संशय व्यक्त होत असून, पोलिसांच्या या गूढ भूमिकेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

स्थानिक DB पथक सुस्त; LCB ने पकडला ४० लाखांच्या गांजा !

स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर-मंचर रस्त्यावरील कवठे येमाई (इचकेवाडी) येथे छापा टाकून स्कॉर्पिओ गाडीसह तब्बल ६१ किलो गांजा आणि असा एकूण ४० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळून एवढी मोठी कारवाई करता येते, परंतु शिरूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या गुन्हे शोध पथकाला (DB) आपल्याच हद्दीत सुरू असलेल्या एवढ्या मोठ्या साठ्याची साधी कुणकुणही लागत नाही, हे अत्यंत संशयास्पद आहे. स्थानिक पोलिसांचे हे अपयश म्हणजे निव्वळ अक्षम्य दुर्लक्ष आहे की आर्थिक हितसंबंधांतून केलेली डोळेझाक, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पत्त्यांच्या डावावरून गोळीबार; तरुणाचा नाहक बळी

शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा कळस नुकताच लाटेआळी, आंबेडकरनगर भागात पाहायला मिळाला. पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या डावावरून झालेल्या वादातून भरदिवसा हरिश दादाभाऊ गंगावणे या ३४ वर्षीय तरुणावर पिस्तुलातून गोळी झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

शहरात रात्रीच्या वेळी गस्त का होत नव्हती? भरवस्तीत बेकायदेशीर जुगाराचे अड्डे राजरोस सुरू असताना पोलिसांना त्याचा थांगपत्ता कसा नव्हता? आणि सराईत गुन्हेगारांकडे गावठी पिस्तूल कुठून आले? या सर्व प्रश्नांवरून शिरूर पोलिसांचा गुन्हेगारांवर कवडीचाही धाक उरलेला नाही, हे उघड झाले आहे.

SP साहेबांचे विनोद पाटलांवर मेहेरबानी का?

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटना केवळ एका अधिकाऱ्याचे अपयश नसून संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचे अधःपतन दर्शवतात. इतके गंभीर गुन्हे घडूनही आणि जनतेतून तीव्र असंतोष व्यक्त होत असतानाही, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यावर कोणतीही प्रशासकीय कारवाई केलेली नाही.

स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्याची तात्काळ उचलबांगडी का केली जात नाही? पोलीस अधीक्षकांना अशी कोणती राजकीय वा प्रशासकीय अडचण आहे, ज्यामुळे विनोद पाटलांना पाठीशी घातले जात आहे? असे संतप्त सवाल विचारले जात आहेत. जर वरिष्ठांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून निष्क्रिय अधिकाऱ्यांची बदली केली नाही आणि सर्व गुन्ह्यांचा पारदर्शक फेरतपास केला नाही, तर सामाजिक संघटनां रस्त्यावर उतरणार असल्याची चर्चा शहरामध्ये होतं आहे.