Ads
Ads

फरार आरोपीचा फास आवळला; मोका आरोपीला युनिट-३ने जेरबंद केला!

फरार आरोपीचा फास आवळला; मोका आरोपीला युनिट-३ने जेरबंद केला!

पुणे, (भगवान श्रीमंदिलकर) -   

पुणे शहरातील गंभीर गुन्हे आणि मोका (MCOCA) अंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने अचूक गोपनीय माहितीच्या आधारे मोका गुन्ह्यातील फरार आरोपी पंकज सुरेश वांभिरे (वय २४, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) याला त्याच्या राहत्या घरातून धाडसी कारवाई करत जेरबंद केले.

गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी कोथरूड येथील राहत्या घरी आल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत अणछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपीला कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले.

पोलिस चौकशीत आरोपीचा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे Image निष्पन्न झाले. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३चे पोलिस निरीक्षक प्रशांत अणछत्रे व त्यांच्या पथकाने केली. शहरातील सराईत व फरार गुन्हेगारांविरुद्ध अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Image