गुन्हेगारांचा डाव फसला; पोलिसांचा सापळा कसला!
यवतमध्ये तीन गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे जप्त; कारसह ₹५.३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तिघे अटकेत
पुणे ( भगवान श्रीमंदिलकर ) -
पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरोधात धडक कारवाई करत भांडगाव (ता. दौंड) परिसरातून तीन गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे व एक बलेनो कार असा ₹५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व त्यांचा वापर करून गुन्हे करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला भांडगाव परिसरात संशयित बलेनो कारमधून काही जण अवैध शस्त्रांसह येणार असल्याची गोपनीय माहिती
मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून संबंधित वाहन अडवले. झडतीमध्ये आरोपींकडून तीन गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे तसेच कार जप्त करण्यात आली.
या कारवाईत मंगेश शंकर मासाळे (२४), सुरज संजय शेलार (२६) आणि रोहित प्रेमदास भुजबळ (२४), सर्व रा. यवत, ता. दौंड यांना अटक करण्यात आली. त्यांनी ही शस्त्रे कुठून आणली, त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणी आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. अवैध शस्त्रांविरोधातील ही कारवाई गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, पुढील तपास सुरू आहे.


