पाच लाखांचा मुद्देमालासह तस्कराला पोलिसांचा झटका!
पुणे | प्रतिनिधी ( भगवान श्रीमंदिलकर ) -
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या "झोन-7 : मिशन क्रॅकडाऊन" अंतर्गत अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत आणखी एक मोठे यश मिळाले आहे. पीएसआय राठोड यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने लोहगाव परिसरात धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि मारुती स्विफ्ट कारसह तब्बल ₹5,17,790 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून अवैध तंबाखू व्यवसायाला मोठा हादरा बसला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6.45 वाजता वडगावशिंदे रोड, लोहगाव येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुनील संभाजी खांदवे (वय 40) याच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व
सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात साठवून विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संपूर्ण साठा जप्त केला.
जप्त मुद्देमाल
प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू
मारुती स्विफ्ट कार (MH-12-SQ-2862)
एकूण किंमत : ₹5,17,790
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023, सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम, 2003 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून तपास सुरू आहे.
अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा आक्रमक पवित्रा
"मिशन क्रॅकडाऊन" अंतर्गत झोन-7 मध्ये प्रतिबंधित गुटखा, अमली पदार्थ, अवैध दारू, जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरू असून आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले
आहे.
नागरिकांना आवाहन
अवैध गुटखा विक्री, अमली पदार्थ, अवैध दारू, जुगार किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ झोन-7 पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


