कायदा सर्वांसाठी समान, संविधानाचा राखलाच पाहिजे मान; पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल यांचे स्पष्ट आव्हान!
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार, मात्र शासकीय कामात अडथळा किंवा कार्यालयांना कुलूप लावणे कायद्याला धरून नाही; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार!
शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) -
"लोकशाहीत आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकणे किंवा कायदा हातात घेणे पूर्णपणे अयोग्य आहे. कायदा सर्वांसाठी समान असून संविधानाचा मान प्रत्येकाने राखलाच पाहिजे," असा स्पष्ट आणि खणखणीत इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंह गिल (IPS) यांनी दिला आहे. शिरूर दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी आणि नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
सनदशीर मार्गाने प्रश्न मांडा, शासकीय कामकाजात अडथळा नको
शासकीय कार्यालयांसमोर होणारी निदर्शने आणि कुलूप ठोकण्याच्या आंदोलनांविषयी बोलताना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी कडक शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "शासकीय कार्यालये ही केवळ एका अधिकाऱ्याची नसून ती संपूर्ण जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. कार्यालयाला कुलूप लावल्याने इतर सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबतात आणि प्रशासकीय यंत्रणेवर विनाकारण ताण येतो. आंदोलकांनी आपले प्रश्न, मागण्या प्रशासनापुढे जरूर मांडाव्यात; मात्र त्यासाठी सनदशीर आणि कायदेशीर मार्गाचाच अवलंब करावा. जर कोणी कायदा हातात घेऊन शासकीय मालमत्तेचे नुकसान करत असेल किंवा कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असेल, तर अशा प्रवृत्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल."
अपघातांना चाप लावण्यासाठी 'ब्लॅक स्पॉट' आणि अनधिकृत दुभाजकांवर कारवाई
परिसरातील महामार्गांवर होणारे भीषण अपघात आणि वाहतूक कोंडी या गंभीर विषयावरही पोलीस अधीक्षकांनी भाष्य केले. रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत.
विशेषतः अनेक ठिकाणी हॉटेल, ढाबे अथवा स्वतःच्या सोयीसाठी महामार्गावरील दुभाजक (डिवायडर) परस्पर तोडल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अनधिकृत कट आणि दुभाजकांमुळे निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "स्वतःच्या स्वार्थासाठी महामार्गावरील दुभाजक तोडणाऱ्यांवर आणि वाहतूक सुरक्षेला हरताळ फासणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.
गुन्हेगारी आणि समाजकंटकांवर करडी नजर
तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण ताकदीने सज्ज असून अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि शांतता भंग करणाऱ्यांवर झिरो टॉलरन्स (Zero Tolerance) धोरण राबवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेला निर्भय वातावरण देणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी स्थानिक पोलीस अधिकारी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांच्या या रोकठोक आणि निःपक्षपाती भूमिकेचे तालुक्यातील सुज्ञ नागरिकांमधून स्वागत होत आहे.


