लाचखोरांवर कारवाईचा दणका फार, मग ठाणे प्रमुखांना अभय का वारंवार?
नियंत्रण कक्षाची बदली रखडली, साहेबांची खुर्ची कशी वाचली?
एकाच दिवशी दोन ‘ट्रॅप’ने खाकी डागाळली; पोलीस अधीक्षक ठाणे प्रमुखांना पाठीशी का घालत आहेत?
शिरूर ( भगवान श्रीमंदिलकर ) -
पोलीस ठाण्यात एकाच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) दोन मोठे छापे पडतात, एका कारवाईत लाचखोर कर्मचारी ‘बनकर’ रंगेहात पकडला जातो, तर दुसऱ्या कारवाईत चक्क ९५ हजार रुपयांची लाच घेऊन दुसरा अंमलदार पसार होतो. एवढा मोठा लाचखोरीचा बाजार पोलीस ठाण्यात उघड्या माथ्याने मांडला गेला असताना, ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षकांवर साधी प्रशासकीय कारवाईही न होणे, ही बाब आता संपूर्ण पोलीस दलात संशयाचे मोहोळ उठवणारी ठरत आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना मूळ ठाणे प्रमुखांना नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) संलग्न करण्याची प्रक्रिया का रखडली? पोलीस अधीक्षकांच्या (SP) या संशयास्पद भूमिकेमुळे वरिष्ठ पातळीवरूनच ठाणे प्रमुखांना अभय दिले जात आहे का, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.
एकाच वेळी दोन ट्रॅप; ठाण्यात लाचखोरीचा उघड बाजार
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित पोलीस ठाण्यावर टाकलेल्या दुहेरी धाडीने पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. पहिल्या कारवाईत लाचेची रक्कम स्वीकारताना ‘बनकर’ नावाचा अंमलदार एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला. मात्र, याच वेळी घडलेल्या दुसऱ्या कारवाईत पोलीस खात्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. एसीबीची चाहूल लागताच दुसरा लाचखोर अंमलदार तब्बल ९५ हजार रुपयांची लाच घेऊन घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी ठरला.
पोलीस ठाण्याच्या आवारात किंवा कार्यक्षेत्रात एकाच दिवशी दोन कारवाया होणे आणि लाखोंची देवाणघेवाण सुरू असणे, हे ठाण्यातील कारभारावर कोणाचेही नियंत्रण उरले नसल्याचे स्पष्ट द्योतक आहे. इतकी मोठी रक्कम कर्मचाऱ्यांच्या खिशात जात असताना ठाणे प्रमुख झोपा काढत होते का, हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
‘पर्यवेक्षी अपयश’ स्पष्ट; तरीही अधीक्षकांची कारवाई का थंडावली?
गृह विभागाच्या आणि पोलीस नियमावलीनुसार (Police Manual), पोलीस ठाण्यातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर लाचखोरी किंवा गंभीर गैरवर्तनाचा ठपका बसल्यास, त्यास ठाणे प्रमुखाचे ‘पर्यवेक्षी अपयश’ (Supervisory Failure / Leniency) मानले जाते. अशा घटनांनंतर तपासात कोणताही हस्तक्षेप होऊ नये, पुराव्यांशी छेडछाड होऊ नये आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी संबंधित ठाणे प्रमुखाची तात्काळ नियंत्रण कक्ष (Control Room) किंवा जिल्हा मुख्यालयात (HQ) संलग्न (Attach) बदली करण्याचा स्पष्ट नियम आहे.
मात्र, या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी (SP) डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधल्याचे चित्र दिसते. एवढा मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊनही ठाणे प्रभारींची बदली का करण्यात आली नाही? ज्या पदावरून कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर वचक ठेवणे अपेक्षित होते, त्या ठाणे प्रमुखाची खुर्ची वाचवण्यासाठी पोलीस अधीक्षक इतके मेहेरबान का झाले आहेत? या संशयास्पद मौनामुळे पोलीस अधीक्षकांच्या कार्यपद्धतीवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बदली रखडवून तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न?
स्थानिक पोलीस ठाण्यात ठाणे प्रभारी अद्यापही त्याच पदावर ठाण मांडून बसल्यामुळे खालील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत:
तपासाची निष्पक्षता धोक्यात: ठाणे प्रभारी पदावर कायम राहिल्यास तपासावर दबाव आणला जाऊ शकतो आणि पसार झालेल्या ९५ हजारांच्या लाचखोराला वाचवण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी स्थानिक यंत्रणेचा वापर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा बळी, वरिष्ठ मोकळे: लाचेची मागणी ही केवळ कर्मचाऱ्यांच्या मर्जीने होती की त्यामध्ये ‘वरिष्ठांचा हिस्सा’ ठरलेला होता, हा मूळ संशय आहे. तरीही कनिष्ठांवर कारवाई आणि प्रमुखांना क्लीन चिट देण्याची घाई का सुरू आहे?
खात्यांतर्गत साटेलोटे: पोलीस अधीक्षकांकडून कारवाईसाठी टाळाटाळ केली जात असल्याने, ठाणे प्रमुख आणि जिल्हा मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत साटेलोटे तर नाही ना, अशी चर्चा आता पोलीस वर्तुळातच दबक्या आवाजात
सुरू आहे.
जनतेचा विश्वास उडाला; आता गृहमंत्रालय दखल घेणार का?
पोलीस दलात शिस्त आणि पारदर्शकता राखण्याची प्राथमिक जबाबदारी ही जिल्हा पोलीस अधीक्षकांची असते. मात्र, आपल्याच अखत्यारीतील पोलीस ठाण्यात उघडपणे लाचेचे रॅकेट चालत असताना आणि एकाच दिवशी दोन-दोन ट्रॅप लागूनही जर अधीक्षकांचे हात कारवाईसाठी थरथरत असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा?
लाचखोर फरार होतो, दुसरा जाळ्यात अडकतो, मात्र ठाणे प्रमुखांची पाठराखण केली जाते. आता या प्रकरणात पोलीस अधीक्षक आपली निष्क्रियता झटकून ठाणे प्रमुखाची नियंत्रण कक्षात रवानगी करून खातेनिहाय चौकशी (DE) लावणार, की वरिष्ठ पातळीवरूनच या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


