Ads
Ads

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्या सकल मराठा समाजाचे शिरूर तहसीलदारांना निवेदन; आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्या

सकल मराठा समाजाचे शिरूर तहसीलदारांना निवेदन; आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

शिरूर  ( प्रतिनिधी ) - 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील गेल्या बारा दिवसांपासून उपोषणाला बसले असून, त्यांच्या प्रकृतीची दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. शासनाने अधिक वेळकाढूपणा न करता आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने शिरूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.त्याच बरोबर आंदोलनास पाठिंबा म्हणून शिरूर शहरातून  जाणारा जुन्या पुणे अहिल्यानगर महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार स्नेहल गिरगोसावी व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की

जरांगे-पाटील यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे शासनाने आश्वासने व चर्चेच्या नावाखाली Image विलंब न करता ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मराठा समाजाने आतापर्यंत लोकशाही व शांततेच्या मार्गाने शासनावर विश्वास ठेवून मागण्या मांडल्या. मात्र, वारंवार आश्वासने मिळूनही प्रश्न प्रलंबित राहिल्याने समाजात तीव्र रोष व असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष दिवसेंदिवस वाढत असून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचा इशाराही देण्यात आला.

“शासनाने मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीची आणखी हानी होण्यापूर्वी तातडीने हस्तक्षेप करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,” अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित शासन विभागांकडे पाठवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शिरूर नगरपरिषद बांधकाम समितीचे सभापती सुनिल जाधव, नगरसेवक अभिजीत पाचर्णे सागर नरवडे,निलेश गाडेकर उमेश शेळके,   माजी उपसरपंच संभाजीराव कर्डीले,  प्रा. सतीश धुमाळ, अविनाश जाधव, रमेश दसगुडे , योगेश महाजन, संपत दसगुडे, जयवंत साळुंखे, बाळासाहेब आवारी,  रामभाऊ शेटे, सुशांत कुटे,अविनाश घोगरे, वैशाली गायकवाड, बंटी जोगदंड, अनिल डांगे, स्वप्निल रेड्डी, महेंद्र येवले,सिद्धांत चव्हाण, सुरज काळे रियाझ सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.