Ads
Ads

पुणे शिक्षक मतदार संघांसाठी लागली फिल्डिंग; मंगेश चिवटेंनी अमित शहांकडेच केली थेट मोर्चेबांधणी!

पुणे शिक्षक मतदार संघांसाठी लागली फिल्डिंग; मंगेश चिवटेंनी अमित शहांकडेच केली थेट मोर्चेबांधणी!

महायुतीत उमेदवारीचा वाढला ट्विस्ट; कर्नाटक कनेक्शनमुळे राजकीय समीकरणांना आला वेग

पुणे (भगवान श्रीमंदिलकर) - 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. जागा वाटपावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच या निवडणुकीत एक मोठा ‘ट्विस्ट’ समोर आला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी थेट भाजपचे केंद्रीय चाणक्य, गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारी धाव घेतली आहे. कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांची हुबळी येथे भेट घेऊन चिवटे यांनी ही जागा शिवसेनेकडे खेचून आणण्यासाठी थेट राष्ट्रीय पातळीवरून फिल्डिंग लावल्याने महायुतीतील इतर इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.

हुबळीत अमित शाहंची भेट; कर्नाटकच्या दिग्गज नेत्यांची मध्यस्थी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कर्नाटक दौऱ्यावर असताना के. एल. ई. शिक्षण संस्थेच्या हुबळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान मंगेश चिवटे यांनी स्वतः उपस्थित राहून अमित शाह यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, के. एल. ई. संस्थेचे सर्वेसर्वा तथा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण भेट घडवून आणण्यात आली. दक्षिण महाराष्ट्रात आणि सीमाभागातील शैक्षणिक वर्तुळात डॉ. प्रभाकर कोरे यांचा मोठा राजकीय व संस्थात्मक प्रभाव आहे. कोरे यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी थेट अमित शाह यांच्याकडे शब्द टाकला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे चिवटे यांच्या दाव्याला मोठे राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

जागा वाटपावरून महायुतीत चढाओढ

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमध्ये आधीपासूनच चुरस पाहायला मिळत आहे. भाजप नेते व उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे मतदारसंघ भाजपचे परंपरागत मतदारसंघ असल्याचा दावा यापूर्वीच केला होता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्यासाहेब माने यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पुणे पदवीधर राष्ट्रवादीकडे, तर पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे असावा, असे परस्पर जागा वाटपाचे सूत्र मांडले होते.

स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या परस्पर जागा वाटपावर शिवसेनेने (शिंदे गट) तीव्र आक्षेप नोंदवला होता. कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हेच घेतील, स्थानिक नेत्यांनी परस्पर निर्णय जाहीर करू नयेत, असा थेट इशारा दिला होता.

चिवटेंच्या ‘दिल्ली वारी’ची चर्चा

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत हेदेखील महायुतीतून उमेदवारीसाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, मंगेश चिवटे यांनी थेट भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे धाव घेत महायुतीच्या स्थानिक समीकरणांना सुरुंग लावला आहे. कर्नाटक कनेक्शनच्या माध्यमातून घातलेल्या या राजकीय गाठीभेटीनंतर पुढील आठवड्यात चिवटे यांना दिल्लीतही आमंत्रित करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी नेमकी भाजपच्या पारड्यात पडणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या मंगेश चिवटे यांच्या गळ्यात पडणार, याकडे आता अवघ्या राजकीय आणि शिक्षक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.