Ads
Ads

प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी यांनी घेतली शिरूरमध्ये आढावा बैठक!'सेवा संकल्प' अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांना दिले निर्देश!

प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी यांनी घेतली शिरूरमध्ये आढावा बैठक!'सेवा संकल्प' अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांना दिले निर्देश!

शिरूर (प्रतिनिधी) -

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या 'सेवा संकल्प अभियाना'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिरूर तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. शिरूरचे प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अभियानातील सर्व उपक्रम तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून मोहीम यशस्वी करण्याचे थेट निर्देश सर्व खातेप्रमुखांना देण्यात आले.

या बैठकीस शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके, महिला बालकल्याणच्या निर्मला चोभे यांच्यासह महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, महावितरण आणि नगरपरिषद अशा सर्वच शासकीय विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

          बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी यांनी स्पष्ट केले की, हे अभियान केवळ औपचारिक न राहता सर्वसामान्य जनतेला शासकीय सेवांचा प्रत्यक्ष लाभ देणारे ठरले पाहिजे. तालुका स्तरावर 'सेवा सेतू अभियान' आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे नियोजनबद्ध आयोजन करून प्रलंबित फेरफार नोंदी, जिवंत सातबारा मोहीम, सातबारा व आठ-अ अद्ययावत करणे, जमिनीच्या खरेदी-विक्री नोंदी, तसेच गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप यांसारखी महसुली कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. तसेच वन हक्क दावे निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना अधिकार अभिलेख देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही त्यांनी महसूल यंत्रणेला दिले.

विविध विभागांना जबाबदारीचे वाटप

शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रां'चा प्रभावी वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

          याशिवाय बैठकीत खालील विषयांवर विशेष भर देण्यात आला असून ग्रामीण व शहरी विकासाठी गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या समन्वयाखाली प्रत्येक गावात 'सेवा माझे योगदान' अंतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, प्लास्टिक मुक्ती व जलस्रोत स्वच्छता उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

          शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थी व युवकांचा सहभाग वाढवून शाळा-महाविद्यालयांमध्ये 'विकसित भारत' संकल्पनेवर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अहवाल सादर करावा. तसेच नवनवीन संकल्पना मांडणाऱ्या युवकांसाठी 'इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धा राबवावी असे सूचना बैठकीत देण्यात आल्या.

  महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्रांवर माता व बालकांसाठी 'अंगणवाडी उत्सव' साजरा करून पोषण योजनांची माहिती देणे आणि अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्याचे नियोजन करावे.

    तसेच शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन 'आशीर्वादाचा दिवा' प्रज्वलित करणे आणि लाभार्थ्यांच्या यशोगाथा (बदलाची गोष्ट) संकलित करून त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

            या मोहिमेदरम्यान शिधापत्रिका वाटप, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रे, महिला बचत गट नोंदणी आणि प्रलंबित घरगुती वीज जोडण्यांचे काम विहित मुदतीत पूर्ण केले जावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले.

तालुक्यातील कोणत्याही पात्र नागरिकाला योजनेच्या लाभापासून वंचित राहू न देता शासकीय कामांमध्ये गतिमानता आणि पारदर्शकता आणावी, असा सज्जड इशारा देत प्रांत अधिकाऱ्यांनी अभियानाचा दैनंदिन प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले असल्याचे प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

 

​"‘सेवा संकल्प अभियान’ ही सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठी संधी - बाळासाहेब म्हस्के (तहसीलदार, शिरूर)

फेरफार नोंदी, शिधापत्रिका, दाखले व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचा महसूल प्रशासनाचा मानस आहे. तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा दक्ष राहून काम करेल; कोणत्याही नागरिकाला शासकीय कामांसाठी चकरा माराव्या लागणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल."