पूर्वीचे वैमनस्य, रात्री पत्त्यांवरून झाला वाद; सकाळी गोळीबार, हरि गंगावणे चा झाला जागीच मृत्यू !कायदा-सुव्यवस्थेवर होत आहे सवाल!
शिरूर (प्रतिनिधी) : पूर्वीच्या वैमनस्यातून निर्माण झालेला वाद, त्यातच रात्री पत्ते खेळताना झालेल्या कथित वादाची भर आणि त्यानंतर सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शिरूर शहर हादरले आहे. या गोळीबारात हरि गंगावणे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरि गंगावणे यांचे काही व्यक्तींशी पूर्वीपासून वैमनस्य असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री पत्ते खेळत असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. रात्रीचा वाद मिटविण्यात आला होता, असेही बोलले जात आहे. मात्र, त्यानंतर सकाळी अचानक गोळीबाराची घटना घडल्याने
रात्री वाद मिटला असेल तर सकाळी गोळीबार नेमका कसा झाला? गोळीबारामागील खरे कारण काय?
असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मृतदेह पुणे येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असल्याचे समजते.
या घटनेप्रकरणी अद्याप तक्रार प्राप्त झालेली नसल्याने गुन्हा दाखल झालेला नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर नेमकी घटना, गोळीबाराचे कारण आणि संशयितांची भूमिका याबाबत अधिकृत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौथी घटना?
दरम्यान, संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबारासह गंभीर स्वरूपाच्या घटनांची मालिका सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. ही या
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौथी घटना
असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. या आकडेवारीची अधिकृत पुष्टी मात्र पोलिसांकडून होणे बाकी आहे.
पोलिसांचा धाक उरला नाही का?
शिरूर शहरात दिवसाढवळ्या अथवा सकाळच्या वेळेत गोळीबारासारखी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांचा धाकच उरला नाही का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींवर वेळीच अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
रात्रीचा वाद मिटला, मग सकाळी गोळीबार कसा?
या संपूर्ण घटनेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रात्री पत्ते खेळताना वाद झाला आणि तो नंतर मिटविण्यात आला असल्याची चर्चा असताना सकाळी गोळीबाराची वेळ का आली? रात्रीच्या वादानंतर नेमके काय घडले? गोळीबार कोणी आणि कोणत्या कारणातून केला? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
सध्या गोळीबारामागील कारण स्पष्ट झालेले नसून, पोलिस तपासानंतरच घटनेचे नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेने शिरूर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ आणि भीतीचे वातावरण आहे.
“माझा लेकरू मला सोडून गेला… त्याचा मृतदेह मी कसा ताब्यात घेऊ? आधी माझ्या मुलाला न्याय द्या, आरोपीला तातडीने अटक करा! आरोपी मोकाट असताना मी माझ्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे; माझ्या लेकराच्या रक्ताला न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही!” — अश्रू अनावर झालेल्या मातेचा हृदयद्रावक आक्रोश.
“शहरात ‘काळे’च्या आडून अवैध धंद्यांना उधाण? रात्री वाद मिटविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा, मग सकाळी गोळीबारापर्यंत प्रकरण कसे पोहोचले? या सर्व प्रकाराची पोलिसांकडून सखोल चौकशी होणार का?” — नागरिकांमधून उपस्थित होत असलेले सवाल.
“माझा लेकरू मला सोडून गेला… त्याचा मृतदेह मी कसा ताब्यात घेऊ?
आधी माझ्या मुलाला न्याय द्या, आरोपीला तातडीने अटक करा! आरोपी मोकाट असताना मी माझ्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे; माझ्या लेकराच्या रक्ताला न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही!” — अश्रू अनावर झालेल्या मातेचा हृदयद्रावक आक्रोश.


