Ads
Ads

शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी घेतली निलेश वाळुंज यांच्या आंदोलनाची दखल! प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना धाडले तत्काळ लेटर!

शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी घेतली निलेश वाळुंज यांच्या आंदोलनाची दखल! प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना धाडले तत्काळ लेटर!

​शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) -

पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ (NH-753F) वरील वाढती अपघातांची मालिका आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या गंभीर प्रश्नावर अखेर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते व व्हिसलब्लोअर निलेश यशवंत वाळुंज यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची शिरूरचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी संबंधित सर्वच विभागांच्या प्रमुखांना तातडीने कडक पत्र धाडून तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.  

​

तहसीलदार म्हस्के यांनी नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ खपवून न घेता सार्वजनिक बांधकाम विभाग (पुणे व अहिल्यानगर), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) आणि शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव पोलीस प्रशासनाच्या प्रमुखांना अधिकृत पत्र पाठवले आहे. आंदोलक निलेश वाळुंज यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत आपापल्या कार्यक्षेत्रात तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश तहसीलदारांनी या पत्राद्वारे दिले आहेत.  

​आंदोलनातून उपस्थित झालेले प्रमुख मुद्दे:

​संविधानाच्या कलम २१ चे रक्षण: सुरक्षित प्रवास हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून जनतेला सुरक्षित रस्ते पुरवणे ही प्रशासनाची घटनात्मक व कायदेशीर जबाबदारी आहे.  

​सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: रस्ते सुरक्षेकडे दुर्लक्ष करणारे बेजबाबदार अधिकारी तसेच स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर दुभाजक (डिव्हायडर) तोडणाऱ्या व्यावसायिकांवर सदोष मनुष्यवधासह इतर कठोर गुन्हे दाखल व्हावेत.  

​रोड सेफ्टी ऑडिटची मागणी: पुणे ते अहिल्यानगर संपूर्ण महामार्गाचे तात्काळ Road Safety Audit करून धोकादायक 'ब्लॅक स्पॉट' शोधून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.  

​अवैध क्रॉसिंग बंद करा: अपघातांना निमंत्रण देणारे अनधिकृत दुभाजक तत्काळ बंद करावेत आणि प्रमुख चौकांमध्ये सर्कल, सिग्नल, स्ट्रीट लाईट, सर्व्हिस रोड व शास्त्रीय गतिरोधक उभारावेत.  

​जबाबदारीची टोलवाटोलवी थांबवा: PWD आणि MSIDC या यंत्रणांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलणे बंद करून आपत्कालीन संपर्क फलक लावावेत.  

​वरिष्ठ स्तरावरही पाठवल्या पत्राच्या प्रती

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी या पत्राच्या प्रती पुणे व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी (गृहशाखा), पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण व अहिल्यानगर) आणि उपविभागीय अधिकारी यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवल्या आहेत.  

​तहसीलदारांच्या या गतिमान आणि आक्रमक भूमिकेमुळे शासकीय यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, आता संबंधित विभाग महामार्गावरील मृत्यूचा सापळा हटवण्यासाठी नेमकी काय कृती करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

बाळासाहेब म्हस्के  तहसीलदार शिरूर 

 "पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील अपघातांचे सत्र आणि सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. नागरिकांचे जीव जाण्यापूर्वीच योग्य ती सुरक्षा करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. उपोषणकर्ते निलेश वाळुंज यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची तातडीने दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण व पोलीस प्रशासनाला तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्ते सुरक्षेच्या मानकांची अंमलबजावणी करून नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल."