Ads
Ads

शिरूर तहसीलदारांना दालनातच केले बंद; जिल्हाधिकारी यांनी घेतली याची गंभीर दखल! बेकायदेशीर कृती पडली महाग; आंदोलक निलेश वाळुंज यांच्यासह इतरांवर सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा झाला नोंद!

शिरूर तहसीलदारांना दालनातच केले बंद; जिल्हाधिकारी यांनी घेतली याची गंभीर दखल! बेकायदेशीर कृती पडली महाग; आंदोलक निलेश वाळुंज यांच्यासह इतरांवर सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा झाला नोंद!

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) :

पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शिरूर येथे बेकायदेशीर वेगळे वळण लागले आहे. शिरूर तहसीलदार कार्यालयात सुरू असलेल्या कामकाजादरम्यान थेट तहसीलदार यांच्या दालनाला बाहेरून लोखंडी साखळी आणि कुलूप लावून त्यांना दालनातच कोंडण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या बेकायदेशीर कृत्याची जिल्हा प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, आंदोलक सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाढते अपघात रोखणे, रस्ते सुरक्षा, अतिक्रमण निर्मूलन आणि सर्व्हिस रोडची निर्मिती या मागण्यांसाठी निलेश वाळुंज (रा. अण्णापूर, ता. शिरूर) हे १८ ऑगस्टपासून तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलनास बसले होते. 

         या आंदोलनाची शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तातडीने दखल घेत संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला होता.तसेच शिरूरचे प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी, विभागीय पोलिस उप अधिक्षक तसेच शिरूर चे पोलिस निरीक्षक विनोद पाटिल यांनी वेळोवेळी आंदोलनाची दखल घेतली होती. वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून सातत्याने संपर्कात होत असल्याचे बोलले जात आहे.

                        त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी 11.30 च्या सुमारास मा. तहसीलदारांनी रस्त्याशी संबंधित विविध यंत्रणा व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन अतिक्रमण काढणे व उपाययोजना करण्याचे ठोस निर्देश दिले होते.

दुपारी तहसीलदार नेहमीप्रमाणे दालनात कार्यालयीन कामकाज पाहत असताना, दुपारी ३:३० च्या सुमारास निलेश वाळुंज व त्यांचे सहकारी चर्चेसाठी दालनात गेले. चर्चा संपवून दुपारी पावणेचारच्या सुमारास बाहेर पडताच, कोणतीही पूर्वकल्पना न देता निलेश वाळुंज, दिपीका भालेराव, प्रितेश फुलडहाळे आणि इतर तीन अनोळखी इसमांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला लोखंडी साखळी आवळून कुलूप ठोकले. त्यावेळी उपस्थित शिपाई सीमा मोडवे व प्रकाश बोराडे यांनी त्यांना तात्काळ रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी त्यांना न जुमानता तहसीलदार दालनात उपस्थित असतानाच दरवाजा बंद केला.

               काही वेळाने आंदोलक निघून गेल्यानंतर तेथे थांबलेल्या एका व्यक्तीकडून कुलूप उघडून तहसीलदार यांची सुटका करण्यात आली. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर जमाव जमवणे, पूर्वसूचना न देता टाळे ठोकणे आणि शासकीय अधिकाऱ्यांना कोंडून ठेवून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी निवासी नायब तहसीलदार स्नेहा  गिरीगोसावी (वय ३८, रा. सुरज नगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

              या फिर्यादीवरून पोलिसांनी निलेश वाळुंज, दिपीका भालेराव, प्रितेश फुलडहाळे व अन्य तीन जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२७(२), १३२, २२१, २२३, १८९(२), १९० सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केनेकर करत आहेत.