शिरूरचे शासकीय कार्यालय अंधारात, नागरिक झाले बेजार; महावितरणचा भोंगळ कारभार! तहसीलदारांनी दखल घेत पत्र धाडून विचारला जाब!
शिरूर (प्रतिनिधी) -
तालुक्यातील प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या शिरूर तहसील कार्यालयातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शासकीय कामकाजाचा पार बोजवारा उडाला आहे. दर गुरुवारी आणि इतर दिवशीही वारंवार वीज गुल होत असल्याने शासकीय कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराची गंभीर दखल घेत शिरूरचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना थेट पत्र धाडून खडसवत जाब विचारला आहे.
तहसील कार्यालय हे तालुक्याच्या प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र असून, या कार्यालयामार्फत शासन स्तरावरील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर दैनंदिन कामकाज चालते. दाखले, शेतजमीन विषयक कामे, विविध योजना आणि इतर अत्यावश्यक शासकीय कामांसाठी ग्रामीण भागातून हजारो नागरिक दररोज येथे येत असतात. मात्र, महावितरणकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता दर गुरुवारी आणि कामकाजाच्या इतर वेळीही वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे संगणकीय कामकाज, डेटा एन्ट्री आणि शासकीय नोंदी ठप्प होऊन सर्वसामान्य जनतेचे काम वेळेत पूर्ण न होता मोठे हाल होत आहेत.
कृषी अधिकाऱ्यांच्या मीटरचा भारही तहसीलवरच!
या पत्रात तहसीलदारांनी महावितरणच्या आणखी एका अक्षम्य दुर्लक्षावर बोट ठेवले आहे. तहसील कार्यालय, शिरूर या इमारतीमधील विद्युत भार मापक (मीटर) तपासून तालुका कृषी अधिकारी यांचे वीज मीटर बसविण्यात आले आहे. मात्र, हे मीटर आजअखेर महावितरणकडून चालूच करण्यात आलेले नाही. परिणामी, कृषी कार्यालयाचे वीजबिल देखील तहसील कार्यालयाच्या आस्थापना संकलनाकडूनच भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या पार्श्वभूमीवर, तहसील कार्यालयाचा विद्युत पुरवठा गुरुवारी व इतर वेळी खंडित करण्यात येऊ नये, तसेच तालुका कृषी अधिकारी यांचे स्वतंत्र विद्युत भार मापक तत्काळ सुरू करून त्यांना स्वतंत्र विद्युत जोडणी देण्यात यावी, अशी स्पष्ट व कडक तंबी तहसीलदारांनी महावितरण प्रशासनाला पत्राद्वारे दिली आहे. आता तरी महावितरण झोपेचे सोंग सोडून तत्पर सेवा देणार का, याकडे शिरूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


