Ads
Ads

“शेतकरी स्वतः मोबाईलवरून करू शकतात पीक पाहणीची नोंद; ग्राम महसूल अधिकारी यांचीही होणार मदत – तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांचे शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन!”

“शेतकरी स्वतः मोबाईलवरून करू शकतात पीक पाहणीची नोंद; ग्राम महसूल अधिकारी यांचीही होणार मदत – तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांचे शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन!”

जागृत शोध विशेष वृत्त

शिरूर ( प्रतिनिधी ) -  शेतीशी संबंधित विविध शासकीय योजना, पीकविमा भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी सातबारा उताऱ्यावर पिकांची अचूक नोंद असणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे (ई-पीक पाहणी / DCS) मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी आता स्वतःच्या मोबाईलवरून ही नोंदणी अत्यंत सुलभरीत्या करू शकतात. तसेच, ज्या शेतकऱ्यांना मोबाईल वापरण्यात अडचणी येत असतील, त्यांना गावातील तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी व नियुक्त सहाय्यकांची थेट मदत मिळणार आहे. तालुक्यातील सर्व खातेदारांनी या पारदर्शक मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

डिजिटल नोंदणीमुळे शासकीय लाभांचा मार्ग होणार सुकर

शासनाने 'ॲग्रीस्टॅक' (Agristack) संकल्पनेअंतर्गत पीक पाहणीचे संपूर्ण कामकाज डिजिटल केले आहे. शेतात प्रत्यक्ष कोणते पीक उभे आहे, याची अद्ययावत नोंद थेट शासकीय सर्व्हरवर उपलब्ध होते.

 

पीकविमा परतावा  मिळण्यासाठी नुकसानभरपाईचा दावा करताना प्रत्यक्ष शेतातील डिजिटल नोंद अत्यंत महत्त्वाची ठरते.नैसर्गिक आपत्तीची मदत जसे दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व भरपाई या आधारे जलद गतीने होते.

          शासकीय योजना व कृषी कर्ज योजेसह हमीभाव खरेदी केंद्रे, पीक कर्ज आणि अनुदानांचा थेट लाभ मिळवण्यासाठी डिजिटल पीक नोंद अनिवार्य आहे.त्यामुळे केवळ शेतात पीक घेतले म्हणजे जबाबदारी संपली असे न मानता, त्याची वेळेत डिजिटल नोंद करणे तितकेच आवश्यक आहे.

बांधापासून २० मीटरच्या आत फोटो घेणे बंधनकारक केले असून या प्रणालीमध्ये संपूर्ण पारदर्शकता राहावी यासाठी तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांकाच्या प्रत्यक्ष बांधापासून २० मीटरच्या परिघात उभे राहूनच उभ्या पिकाचे थेट छायाचित्र (Live Photo) व जीपीएस लोकेशन नोंदवणे सक्तीचे आहे. या जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञानामुळे परस्पर किंवा चुकीची नोंद करणे अशक्य असून केवळ शेतातील प्रत्यक्ष उभ्या पिकांचीच नोंद दप्तरी होते.

शेतकरी स्वतः मोबाईलवरून अशी करू शकतात नोंदणी :

१. गुगल प्ले स्टोअरवरून 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' (DCS) / ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करून शेतकरी लॉगिन करावे.

२. आपला खाते क्रमांक, गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक निवडावा.

३. चालू हंगाम, पिकाचा प्रकार (एकपीक/मिश्रपीक) आणि अचूक पेरणी क्षेत्र नमूद करावे.

४. प्रत्यक्ष शेतात उभे राहून पिकाचे स्वच्छ छायाचित्र काढून लोकेशनसह सबमिट करावे.

ग्राम महसूल अधिकारी व सहाय्यक करणार थेट मदत

ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही किंवा ज्यांना ॲप हाताळण्यात तांत्रिक अडचण येत आहे, अशा शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने गावनिहाय विशेष व्यवस्था केली आहे. शिरूर तालुक्यातील सर्व गावांमधील तलाठी तथा ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षित सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सहाय्यकांची यादी व संपर्क क्रमांक ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. हे सहाय्यक प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची डिजिटल नोंदणी पूर्ण करून देतील.

वेळेत नोंदणी पूर्ण करा – तहसीलदार बाळासाहेब म्हस्के

पीक नोंदणीबाबत आवाहन करताना तहसीलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले, "डिजिटल क्रॉप सर्व्हेमुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आली असून शेतकऱ्यांचा अचूक डेटाबेस तयार होत आहे. पिकाचा प्रकार, क्षेत्र आणि गट क्रमांक काळजीपूर्वक तपासूनच नोंदवावा, जेणेकरून पुढील शासकीय लाभांमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. शेतकरी स्वतः मोबाईलवरून किंवा ग्राम महसूल अधिकारी व नियुक्त सहाय्यकांच्या मदतीने ही नोंदणी करू शकतात. 'आपल्या शेताची नोंद, आपल्या हाताने' या भावनेने सर्व खातेदारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी आणि प्रशासनास सहकार्य करावे."