दोन गेले, आता तिसऱ्याचा नंबर आला; शिरूरमध्ये एसीबीच्या हॅट्रिकची हवा, रडारवर कोण... चौकीचा अधिकारी की साहेबांचा गळा? चर्चांना आले उधाण!
एसीबीचे पथक अजूनही शिरूरमध्येच ठाण मांडून;
टाकळी हाजी पोलीस चौकी की पोलीस ठाण्यातील बडा मासा गळाला लागणार? खाकी वर्तुळात प्रचंड घबराट!
शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) :
शिरूर पोलीस ठाण्यात लागलेली लाचखोरीची कीड आता चव्हाट्यावर आली असून, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सलग दोन कारवाया करत पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. एकाच २४ तासांत एका हवालदाराला रंगेहाथ बेड्या ठोकल्या, तर दुसऱ्या हवालदाराने चक्क ९५ हजारांची लाच घेऊन अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. मात्र, एसीबीचा हा धडाका इथेच थांबलेला नसून "दोन गेले, आता तिसऱ्याचा नंबर आला" अशी जोरदार चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक अद्यापही शिरूरमध्येच तळ ठोकून असल्याने एसीबी आता 'हॅट्रिक' साधणार का? आणि या तिसऱ्या कारवाईत टाकळी हाजी पोलीस चौकीतील प्रभारी अधिकारी अडकणार की थेट शिरूर पोलीस ठाण्यातील बड्या साहेबांचा गळा रडारवर येणार? या चर्चेने पोलीस वर्तुळाचे धाबे दणाणले आहेत.
२४ तासांत खाकीचे दोन चेहरे उघडे: बनकर गजाआड, तर मुंढे लाचेसह फरार!
शिरूर पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या वसुलीच्या खेळावर एसीबीने सलग दोन सर्जिकल स्ट्राईक केले:
पहिल्या कारवाईत गुन्ह्यात आरोपींना अटक न करता नोटीस देण्यासाठी जुने शिरूर पोलीस ठाण्याच्या बाहेर ११ हजार रुपयांची लाच घेताना हवालदार शिवाजी ज्योतीराम बनकर याला एसीबीने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले.
दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी पोलीस चौकीच्या हद्दीत दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५९ वर्षीय तक्रारदाराकडून स्वतःसाठी व वरिष्ठांच्या नावाने तब्बल ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारून हवालदार सतीश नाथाराव मुंढे हा पथकाची चाहूल लागताच लाचेच्या रकमेसह अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.एकाच दिवशी झालेल्या या दोन कारवायांमुळे पोलीस ठाण्यातील अर्थपूर्ण व्यवहारांचे पितळ उघडे पडले आहे.
एसीबीचे पथक अजूनही शिरूरमध्येच; तिसऱ्या कारवाईची टांगती तलवार!
लाचखोर हवालदार सतीश मुंढे हा ९५ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाल्यामुळे एसीबीने हे प्रकरण अत्यंत प्रतिष्ठेचे केले आहे. मुंढे याच्या शोधासाठी आणि या प्रकरणातील मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी एसीबीचे विशेष पथक अजूनही शिरूर परिसरात तळ ठोकून असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. सलग दोन धक्के दिल्यानंतर आता एसीबी तिसरा वार कोणावर करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात सध्या शुकशुकाट पसरला असून कर्मचाऱ्यांचे फोन बंद, तर काहींचे पाय लटपटताना दिसत आहेत.
टाकळी हाजी चौकी की थेट 'बडे साहेब'? संशयाची सुई नेमकी कोणावर?
सर्वात स्फोटक बाब म्हणजे, हवालदार सतीश मुंढे याने तक्रारदाराकडे लाच मागताना केवळ स्वतःचा हिस्सा मागितला नव्हता, तर थेट 'वरिष्ठांच्या नावाने' लाचेची रक्कम उकळली होती. एसीबीच्या अधिकृत पडताळणीत हा प्रकार स्पष्ट झाल्याने आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत:
हवालदार मुंढे कोणत्या 'वरिष्ठां'च्या नावावर ९५ हजारांची वसुली करत होता?
टाकळी हाजी पोलीस चौकीतील प्रभारी अधिकाऱ्याचा यात मूकसंमतीने सहभाग होता का?
की थेट शिरूर पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांचा (पोलीस निरीक्षक) वरदहस्त या हवालदाराच्या डोक्यावर होता?
जर लाचेची मागणी वरिष्ठांच्या संमतीने झाली असेल, तर एसीबी केवळ हवालदारावर गुन्हा नोंदवून थांबणार की त्या 'वरिष्ठ साहेबांना'ही सहआरोपी करून बेड्या ठोकणार? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
शिरूरकरांमध्ये संताप; लाचखोरांचे धाबे दणाणले!
गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून सर्वसामान्य नागरिकांकडून उकळल्या जाणाऱ्या लाचेच्या रकमा पाहता, शिरूर पोलीस ठाणे हे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आहे की नागरिकांना लुटण्यासाठी? असा उद्विग्न सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एसीबीच्या पुणे परिक्षेत्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या धडक मोहिमेचे शिरूरकरांकडून जोरदार स्वागत होत असून, आता 'हॅट्रिक' साधत खाकी वर्दीतील बड्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा बुरखा टराटरा फाडला जावा, अशीच मागणी जोर धरत आहे.


