Ads
Ads

ठरावाच्या मंजुरीला लाचेची अट; दहा हजारांसह कर्जतचा सहाय्यक निबंधक रंगेहात अटक!

जिल्हा बँक निवडणुकीतील ठराव निकाली काढण्यासाठी मागितली होती ₹१५ हजारांची लाच; एसीबीची कारवाई

जागृत शोध | प्रतिनिधी
अहिल्यानगर, दि. १३ :

भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आणखी एक धडक कारवाई करत कर्जत येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील मिलिंद प्रल्हादराव राजूत (वय ५०) याला ₹१० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे सहकार विभागात खळबळ उडाली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार निश्चित करण्यासंदर्भातील संस्थेचा ठराव मंजूर करण्यासाठी सहाय्यक निबंधकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या ठरावावरील तक्रार निकाली काढण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने सुरुवातीला ₹२५ हजारांची लाच मागितली होती. चर्चेनंतर ही रक्कम ₹१५ हजारांवर निश्चित करण्यात आली. त्यापैकी Image ₹१० हजार आगाऊ देण्याचे ठरले.

लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार नोंदविली. एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. दि. १० जुलै २०२६ रोजी आरोपीने तक्रारदाराकडून ₹१० हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारित) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईचे मार्गदर्शन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. तर पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

नागरिकांना एसीबीचे आवाहन

शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास किंवा भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Image