दिव्यांग बांधवांच्या नूतन शैक्षणिक संकुलाच्या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : जाईताई खामकर यांचे आवाहन
शिरूर (प्रतिनिधी) -
दिव्यांग बांधवांना स्वाभिमानी, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेच्या 'न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी दिव्यांग)' या नूतन शैक्षणिक ज्ञानसंकुलाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:१० वाजता टाकळी हाजी येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. जाई उत्तम खामकर यांनी केले आहे.
हा कार्यक्रम शिनगरवाडी रोडवरील मळगंगा अंध अपंग संस्था, टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे संपन्न होईल. दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देणारा हा प्रकल्प ग्रामीण भागातील दिव्यांग
बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या सोहळ्यास शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू, आंबेगावचे आमदार दिलीपराव वळसे पाटील, सनराईज कँडल्सचे भावेश भाटिया, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मानद डी.लिट व भारतातील पहिले दृष्टिहीन सी.ए. एम. एस. जाधव सर, समाज कल्याण अधिकारी राधाकृष्ण देवडे यांच्यासह उद्योग, समाजकारण व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आदर्श सरपंच दामूअण्णा घोडे, प्राचार्य प्रो. डॉ. प्रशांत पालकर, प्राचार्य भाऊसाहेब रवंदळ आणि मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. पंचक्रोशीतील ग्रामस्थ, दिव्यांग बांधव व पालकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


