Ads
Ads

वाद पेटला, जमाव जमला; दगड-कोयत्यांच्या हल्ल्याने रांजणगाव हादरला!रांजणगाव पोलिसांची अवघ्या २४ तासांत पाच आरोपींच्या आवळल्या मुसक्या

वाद पेटला, जमाव जमला; दगड-कोयत्यांच्या हल्ल्याने रांजणगाव हादरला!रांजणगाव पोलिसांची अवघ्या २४ तासांत पाच आरोपींच्या आवळल्या मुसक्या

शिरूर (प्रतिनिधी) — रांजणगाव गणपती येथील वामन वाईन्स परमिट रूमसमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पूर्वीच्या वादातून जमाव जमवून तरुणावर दगड, फायटर, काठी आणि कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पाच आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांकडील फिर्यादीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रांजणगाव गणपती गावच्या हद्दीतील वामन वाईन्स परमिट रूमसमोर हा प्रकार घडला. आदित्य तुषार शितोळे (वय १९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून धनंजय साळुंखे, गोरख मोरे, मयूर कांबळे यांच्यासह काही अनोळखी इसमांनी जमाव जमवून मारहाण केल्याचा आरोप आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, हाताने, लाथा-बुक्क्यांनी तसेच डोक्यात दगड व फायटरने मारहाण करण्यात आली. आपल्याला वाचविण्यासाठी आलेल्या दादा खेडकर यांनाही हाताने, लाथा-बुक्क्यांनी तसेच कोयता, दगड आणि काठीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला. अवघ्या २४ तासांत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. उर्वरित अनोळखी आरोपींचा शोध सुरू असून, घटनेत वापरलेल्या शस्त्रांबाबतही तपास केला जात आहे.

या प्रकरणी गु.र.नं. ४४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ई. तिडके करीत असून, गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे यांनी दाखल केला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

२४ तासांत कारवाई; पोलिसांचा ॲक्शन मोड!

घटनेनंतर अल्पावधीतच संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याने रांजणगाव पोलिसांच्या तपासाच्या वेगाकडे लक्ष वेधले गेले आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची भूमिका आणि वापरलेल्या शस्त्रांबाबत तपासातून अधिक माहिती समोर येणे अपेक्षित आहे.

पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देत परिसरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई सुरू ठेवली आहे.